चिपळूण : धामणवणेतील जनसुनावणीवर आक्षेप

चिपळूण : कोळकेवाडी धरणातून शहरासाठी राबवण्यात येणाऱ्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेसाठी खेर्डी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या लगत १०० ते १०५ मीटर उंचीवर १ हेक्टर जागा संपादन केली जाणार आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून सार्वजनिक जनसुनावणीची नोटीस वृत्तपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र या नोटीसमधील कालावधीची मुदत फारच अल्प असल्याचा आरोप करत माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी या जनसुनावणीवर आक्षेप घेतला आहे. याबाबतची तक्रार प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे केली असून, जनसुनावणीकरता विहित मुदतीची फेरनोटीस प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.

याबाबत मुकादम यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. १९ एप्रिल २०२५ चे वृत्तपत्रामध्ये सार्वजनिक जनसुनावणी नोटीस प्रसिद्ध झाली आहे. जनसुनावणी नोटीसमध्ये चिपळूण नगर परिषद ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा योजनेकरिता १ हेक्टर जागा संपादित होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या नोटिसीनुसार २३ एप्रिल रोजी धामणवणे ग्रामपंचायतीत जनसुनावणी घेण्यात
येणार आहे. मात्र ही नोटीस फारच अल्प मुदतीची आहे.

नैसर्गिक न्याय व नोटीस नियमानुसार किमान १५ दिवस मुदत आवश्यक होती. प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटिसीवर प्रसिद्धी १५ एप्रिल २०२५ नमूद आहे. प्रत्यक्षात नोटीस १९ एप्रिलच्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोटीस कालावधीची मुदत फारच अल्प असून, त्याबाबत फेरविचार करण्यात यावा. या मुदतीला आमची हरकत व आक्षेप असून, त्याची नोंद घेण्यात येऊन जनसुनावणीसाठी विहित मुदतीची फेरनोटीस प्रसिद्ध करण्यात यावी. तसे न केल्यास पारदर्शकतेच्या नियमांचे उल्लंघन होईल, असेही या निवेदनात म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 22/Apr/2025