चिपळूण : पाझर तलाव दुरुस्तीसाठी १ मे रोजी उपोषणाचा इशारा

चिपळूण : तालुक्यातील पाचाड ग्रामपंचायतीच्या हद्दीत चिलान येथे १९९४-९५ मध्ये बांधलेल्या पाझर तलावाचे काम पूर्ण झालेले नाही. तलावात पाणीसाठा होत नसल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

गेली पाच वर्षे तलावाच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरू आहे; परंतु त्यांना आश्वासने मिळत आहेत. तलावाचे काम मार्गी लागण्यासाठी ग्रामस्थांनी १ मे रोजी उपोषणाचा इशारा दिला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी आयोजित केलेली बैठकही निष्फळ ठरली आहे.

पाचाड तलावाबाबत गेल्या पाच वर्षात केलेल्या प्रयत्नांची माहिती ग्रामस्थांनी दिली. यावेळी जलदूत शहनवाज शहा, रमेश सुर्वे, गजानन सुर्वे, नितीन नार्वेकर, अशोक तावरे उपस्थित होते. ग्रामस्थ म्हणाले, ३० वर्षांपूर्वी बांधलेल्या पाझर तलावाचे काम पूर्ण नसल्याने उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. तलावात जानेवारीनंतर पाणी राहत नाही.

पाझर तलावासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या असून, त्यांनाही कसलाच फायदा होत नाही. पाचाड गावात पाण्याचा कोणत्याही प्रकारचा नैसर्गिक स्रोत नसल्यामुळे जानेवारी महिन्यात पाणीटंचाई चालू होते. पाचाड ग्रामपंचायतीमार्फत कळवंडे येथील विहिरीतून ३ किलोमीटर दूरवरून पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जातो. तोही अपुऱ्या प्रमाणात होत असतो.

पशुधन व शेतीसाठी पाणीसमस्या खूप त्रासदायक असून, शासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे कोणी लक्ष देत नाही. या पाझर तलावाबाबत पंचायत समिती किंवा जलसंधारण विभागाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 30/Apr/2025