खेड : मुंबई-गोवा महामार्गावर मोरवंड्याजवळ शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास एक गंभीर अपघात झाला. चुकीच्या बाजूने आलेल्या एका दुचाकीस्वाराची थेट एसटी बसला धडक बसल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी दुचाकीस्वाराचे नाव समजू शकले नाही.
खेड आगाराचे बसचालक पी. डी. माने हे शिव-खेड बसमधून प्रवाशांना घेऊन खेडच्या दिशेने येत होते. त्याचवेळी मोरवंड्याजवळ समोरून चुकीच्या बाजूने आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या बसला जोरदार धडक दिली. बसचालक माने यांनी तत्काळ बस थांबवून जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
अपघाताची माहिती मिळताच आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलीस यंत्रणाही तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सायंकाळ उशिरापर्यंत या अपघातासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 03/May/2025














