रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील नर्मदा अपार्टमेंट, कोकण रेल्वे कॉलनी, मिरजोळे येथे १ मे २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक मारहाण आणि चाकू हल्ल्याची घटना घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३२४(४), आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ मे २०२५ रोजी दुपारी नर्मदा अपार्टमेंटच्या खाली चार आरोपींनी फिर्यादी चंदन चंद्रकांत जगताप (वय २४) यांच्यावर मारहाण आणि चाकूने हल्ला केला. यात फिर्यादीच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांची सोन्याची चैन तोडण्यात आली.
फिर्यादी चंदन चंद्रकांत जगताप (वय २४, व्यवसाय: मजुरी) हे नर्मदा अपार्टमेंट, रूम नं. ६, कोकण रेल्वे कॉलनी, मिरजोळे येथे राहतात. आरोपींमध्ये शुभम उत्तम जगताप (वय २१), उत्तम फकिरा जगताप (वय ६२), आणि दोन महिलांचा समावेश आहे. सर्व आरोपी कारवांचीवाडी, रत्नागिरी येथील रहिवासी आहेत.
फिर्यादी आपल्या कुटुंबासह घरी असताना चारही आरोपी पूर्वीच्या वादावर चर्चा करण्यासाठी त्यांच्या घरी आले. यावेळी त्यांनी मोठ्याने बोलण्यास सुरुवात केली. फिर्यादीने सर्वांना शांतपणे बोलण्यासाठी बिल्डिंगच्या खाली येण्यास सांगितले. खाली आल्यानंतर फिर्यादीने शुभम जगताप याला “मी तुमचे काय केले?” असा प्रश्न विचारला. त्यावर शुभमने फिर्यादीला मोबाइलवरील रेकॉर्डिंग ऐकण्यास सांगितले आणि त्यांच्या बहिणीला शिवीगाळ का केलीस, असा जाब विचारला.
यानंतर आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत हाताच्या थापटांनी मारहाण सुरू केली. फिर्यादीने या भांडणाचा व्हिडिओ मोबाइलवर रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला असता, शुभम जगताप याने पाठीमागून येऊन फिर्यादीला मारहाण केली आणि नखांनी गळ्यावर ओरबाडले. इतर आरोपींनी फिर्यादीला पाठीमागून धरून खाली पाडले आणि शुभमने चाकूने फिर्यादीच्या डोक्यावर हल्ला करून दुखापत केली. यावेळी फिर्यादीची सोन्याची चैन तोडून नुकसान करण्यात आले.
गुन्ह्याची नोंद:
- गुन्हा क्रमांक: १८१/२०२५
- दाखल: २ मे २०२५, ००:३९ वाजता
- कलम: भारतीय न्यायसंहिता २०२३ चे ११८(१), ११५(२), ३५२, ३२४(४), ३(५)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:24 03-05-2025














