रत्नागिरी शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण अर्धवट; वाहनचालकांसह पादचाऱ्यांची कसरत

रत्नागिरी : शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण अपूर्ण राहिल्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या बाजूपट्ट्यांवर काळी खडी टाकून ठेवण्यात आली आहे. त्यावरून चालण्याचे दिव्य पादचाऱ्यांना करावे लागते. जेलनाका, जिल्हा शासकीय रुग्णालय, जयस्तंभ या ठिकाणी शंभर मीटर भागात काँक्रिट टाकलेले नसल्याने मारूती मंदिरकडून वाहने आणताना उतारामध्ये चांगलेच धक्के सहन करावे लागतात. यामध्ये अपघातही होण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे रखडलेले काँक्रिटीकरण वेळेत पूर्ण करा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

रत्नागिरी शहरातील डांबरी रस्त्यांऐवजी टिकावू काँक्रिटचे रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र दीड वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही शहरातील काँक्रिटीकरणाचे हे काम अजूनही अपूर्णच आहे. रत्नागिरीच्या प्रवेशद्वारापासून १७ डिसेंबर २०२३ ला काँक्रिटीकरणाला सुरवात झाली. एका बाजूने मारूती मंदिरपर्यंतचा रस्ता काँक्रिटचा झाला त्यानंतर नाचणे येथून येणाऱ्या मुख्य रस्त्याचे सुरू केले गेले. त्यामध्येही नियोजन नसल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत होती. काही ठिकाणी बाजूपट्टी काळ्या खडीने भरून त्यावर डांबर टाकण्यात आले आहे; मात्र मारूती मंदिर सर्कल ते बसस्थानकापर्यंत काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांच्या बाजूपट्ट्या अद्यापही जशासतशा आहेत. मारूती मंदिर सर्कल, माळनाका, शासकीय विश्रामगृह, जयस्तंभ ते अगदी बसस्थानकापर्यंत वाहनचालक, पादचारी, नागरिकांना या खडी टाकलेल्या बाजूपट्टीवरून धूळखात जावे लागते. माळनाका येथील एसटीच्या विभागीय कार्यालयासमोरील बाजूपट्टी सोडाच पण गटारही उघडे करून ठेवण्यात आलेले आहे. गाड्या जाताना प्रचंड धुळीचा वाहनचालकांना त्रास होत आहे. जयस्तंभ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना बाजूपट्टी नसल्यामुळे धुळीमुळे नागरिकांना मास्क लावून कार्यालयातील कामाचा निपटारा करावा लागत आहे. बाजूपट्टीवरून अपघाताची शक्यताही आहे. काहीवेळा दुचाकींचे किरकोळ अपघातही झालेले आहेत; मात्र त्याची नोंद होत नाही. रस्त्याची समांतर उंची नसल्यामुळे ताबा सुटलेल्या वाहनांना अपघाताला समोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

रत्नागिरी शहराचे सुशोभीकरण, विकासाच्यादृष्टी शासनाने उचललेले पाऊल योग्य होते; मात्र पूर्वीचा डांबरी रस्ताच बरा होता, असे म्हणण्याची वेळ वाहनचालकांवर आली होती. काँक्रिटीकरणाच्या कामाला कुठेही समांतर रस्त्यांनाही धक्के खातच प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यापर्यंत बाजूपट्टीचे काम होईल की नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, नगरोत्थान योजनेतून सुमारे १०० कोटी रुपये खर्च करून हे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेतून शहरातील माळनाका ते एसटी बसस्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेचे काँक्रिटीकरण सुरू आहे. काँक्रिटीकरणाची ठेकेदार कंपनीची यंत्रणा मागील काही महिन्यांपासून शासकीय विश्रामगृहासमोर अक्षरशः गुंडाळून ठेवण्यात आली आहे. मात्र, आता विरोधकच नसल्यामुळे नागरिकांच्या गैरसोयीकडे दुर्लक्षच झालेले आहे.

रत्नागिरी शहरातील रखडलेल्या काँक्रिटकरणाच्या कामांविषयी मुख्याधिकाऱ्यांशी नुकतीच चर्चा केली होती. त्यांनीही या कामांकडे लक्ष देऊ, असे आश्वासन दिले होते. थांबलेल्या कामांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. हा प्रश्न सुटणे आवश्यक आहे.
– प्रशांत साळुंखे, शहरप्रमुख, शिवसेना

शहरातील रस्त्याची कामे पावसापूर्वी झाली नाहीत तर ठिकठिकाणी पाणी साचून राहील. जिथे बाजूपट्ट्यांची कामे रखडलेली आहेत त्या ठिकाणाहून पादचाऱ्यांना चालणेही शक्य होणार नाही. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलली पाहिजेत.
– प्रसाद सावंत, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:19 07-05-2025