रत्नागिरी : बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्तीसाठी रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाजाच्या वतीने आज जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. मारुती मंदिरापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्धांना मिळावा, या मागणीसाठी बोधगयेत देश-विदेशातील बौद्ध भिक्खू आमरण उपोषणाला बसले आहेत. तिथे सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रत्नागिरीतील सर्व बौद्ध संघटनांनी हा जिल्हास्तरीय मोर्चा आयोजित केला.
सकाळी ११:३० वाजता मारुती मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात बौद्ध समुदायाच्या मागण्या स्पष्ट करण्यात आल्या.
निवेदनात म्हटले आहे की, बिहार सरकार सक्षम नेतृत्वाखाली समृद्ध आहे. बोधगया, राजगीर, नालंदा यांसारख्या बौद्ध स्थळांचे सौंदर्यीकरण, पाटण्यातील बुद्धस्मृती पार्क, बोधगयातील महाबोधी सांस्कृतिक केंद्र यांसारख्या विकासकामांसाठी बौद्ध जगत आणि देश कृतज्ञ आहे. तथापि, बोधगया मंदिर अधिनियम १९४९ हा बिहार सरकारने मंजूर केलेला कायदा संविधानाच्या कलम १३ च्या विरोधात आहे. हा कायदा बौद्ध समुदायाच्या संवैधानिक अधिकारांचा (कलम २५ आणि २६) भंग करतो. त्यामुळे बिहारच्या विधानसभेने या कायद्याच्या संदर्भात सौहार्दपूर्ण समाधान शोधावे, जेणेकरून जगभरातील बौद्धांना न्याय मिळेल. निवेदनात महाबोधी महाविहाराचे पूर्ण व्यवस्थापन बौद्ध समुदायाला देण्याची विनंती करण्यात आली.
रत्नागिरीतील या मोर्चात बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. त्यांनी बोधगयेत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सरकारवर दबाव वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला. मोर्चादरम्यान “महाबोधी विहार बौद्धांना परत द्या” अशा घोषणा देण्यात आल्या. बौद्ध समुदायाच्या या मागणीला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. बोधगया हे बौद्धांचे पवित्र तीर्थस्थान असून, त्याचे व्यवस्थापन बौद्ध समुदायाकडे असावे, ही मागणी दीर्घकाळापासून प्रलंबित आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारत या मागण्यांवर योग्य कारवाईसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. रत्नागिरीतील या मोर्चाने बौद्ध समुदायाच्या एकजुटीचे आणि त्यांच्या न्याय्य मागणीच्या दृढनिश्चयाचे दर्शन घडवले. आता बिहार सरकार आणि केंद्र सरकार या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बौद्ध समुदायाने शांततापूर्ण मार्गाने आपला आवाज बुलंद केला असून, महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी त्यांचा लढा सुरूच राहणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:34 07-05-2025














