लांजा : लांजा तालुक्यातील माजळ, पाथरवाडी आणि जावडे या दुर्गम भागातील प्रवाशांसाठी असलेली एसटी बससेवा अचानकपणे बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील रस्ता वाहतुकीसाठी योग्य असल्याचे स्पष्टपणे कळविल्यानंतरही आगार व्यवस्थापनाने बससेवा बंद ठेवल्याने विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. संतप्त प्रवाशांनी तातडीने बससेवा सुरू करण्याची मागणी केली असून, मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजळ, पाथरवाडी आणि जावडे या मार्गावर १ मे पासून एसटी बसच्या नियमित फेऱ्या पूर्णपणे थांबवण्यात आल्या आहेत. यामुळे या भागातील शाळकरी विद्यार्थी, शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी येणारे तरुण आणि नोकरीसाठी दररोज प्रवास करणारे नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनेक बस फेऱ्या केवळ ताटकेवाडी, रावारीफाटा, कातळगाव फाटा आणि माजळ शाळेपर्यंतच धावत असल्याने, पुढील गावांतील प्रवाशांना मिळेल त्या खासगी वाहनाने किंवा पायी प्रवास करावा लागत आहे. ५ मे रोजी माजळ, जावडे आणि पाथरवाडी येथून सायंकाळी ४ वाजता सुटणारी शेवटची बस कोणतीही सूचना न देता रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना घरी परतण्यासाठी रात्रभर गैरसोयीचा सामना करावा लागला.
या गंभीर परिस्थितीवर अधिक प्रकाश टाकणारी बाब म्हणजे, लांजा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील रस्त्याची पाहणी करून तो सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी योग्य असल्याचा लेखी अहवाल लांजा आगाराला सादर केला आहे. असे असतानाही एसटी प्रशासनाकडून बससेवा सुरू करण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा संतप्त प्रश्न आता प्रवासी विचारत आहेत. या भागातील प्रवाशांच्या या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दैनंदिन जीवनावश्यक कामांसाठी आणि शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची होणारी प्रचंड गैरसोय लक्षात घेता, माजळ, पाथरवाडी आणि जावडे या मार्गावरील बंद पडलेली बससेवा तातडीने सुरू करावी, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून केली जात आहे. जर एसटी प्रशासनाने आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी या मागणीची दखल घेतली नाही, तर नाइलाजाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने याप्रकरणी सकारात्मक निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:53 PM 07/May/2025














