रत्नागिरी : रत्नागिरी शहरात आज पहाटेपासूनच वातावरणात बदल जाणवत होते. सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांच्या कडकडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. विशेषतः कोकणातील आंबा बागायतदार आणि विक्रेत्यांमध्ये या पावसामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोकणचा आंबा हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. यंदा आंब्याच्या हंगामाला चांगली सुरुवात झाली असताना, या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पावसामुळे फळांची गुणवत्ता आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बागायतदार आणि विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. स्थानिक शेतकरी विभव पटवर्धन म्हणाले, “आम्ही आंब्याच्या हंगामासाठी वर्षभर मेहनत घेतो. आता हा पाऊस आमच्या मेहनतीवर पाणी फेरू शकतो.”
पावसानंतर रत्नागिरीच्या वातावरणात गारवा निर्माण झाला असून, तापमान २८ डिग्री सेल्सियसपर्यंत खाली आले आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अशाच अस्थिर हवामानाची शक्यता वर्तवली आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये पिकांचे संरक्षण, पाण्याचा निचरा आणि रासायनिक प्रक्रियांचा वापर यांचा समावेश आहे. स्थानिक बाजारपेठेतही आंब्याच्या किमतींवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने सुचवले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 08-05-2025













