रत्नागिरी, ८ मे २०२५ : रत्नागिरी शहरातील बहुप्रतीक्षित मध्यवर्ती बस स्थानकाच्या अत्याधुनिक इमारतीचे लोकार्पण येत्या ११ मे २०२५ रोजी होणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेले हे बांधकाम नवनिर्माण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने अवघ्या सव्वा वर्षात पूर्ण केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण (भय्या) सामंत यांच्या पुढाकाराने हे स्वप्नवत बस स्थानक प्रत्यक्षात आले आहे. १७.५ कोटी रुपये खर्चून उभारलेली ही देखणी इमारत रत्नागिरीच्या विकासात चार चांद लावणारी ठरेल.
सामंत बंधूंच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीचा कायापालट
रत्नागिरीत गेल्या काही वर्षांत उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाले आहेत. शिवसृष्टी, तारांगण, थ्रीडी मल्टीमीडिया यासारखे प्रकल्प आणि अनेक उद्योगांचे आगमन यामुळे रत्नागिरी जिल्हा विकासाच्या मार्गावर आहे. राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या समर्थ साथीने हे प्रकल्प यशस्वी झाले. रत्नागिरी शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, शासकीय वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना यामुळे रत्नागिरी आता बारामतीसारख्या विकसित शहरांशी स्पर्धा करत आहे.
बस स्थानकाची वैशिष्ट्ये
रत्नागिरी मध्यवर्ती बस स्थानकाची इमारत अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. तळमजल्यावर १८ गाळे आणि शहरी बस सेवेसाठी प्लॅटफॉर्म, तर पहिल्या मजल्यावर बाह्य गावांना जाणाऱ्या एसटी बसेससाठी ६ गाळे आहेत. याशिवाय, दोन कॅन्टीन, दोन पोलीस चौक्या, दोन आरक्षण खिडक्या, स्वच्छतागृहे, विश्रांतीगृह, पार्सल आणि कंट्रोल रूमची व्यवस्था आहे. या सुविधांमुळे प्रवाशांचा गेल्या पाच वर्षांचा त्रास संपुष्टात येईल.
रखडलेल्या प्रकल्पाला गती
गेल्या पाच वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेल्या या प्रकल्पाला उदय सामंत आणि किरण सामंत यांनी गती दिली. स्थानिक नवनिर्माण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला काम देऊन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून हे बांधकाम वेळेत पूर्ण झाले. उदय सामंत यांनी स्वतः अनेकदा कामाच्या प्रगतीची पाहणी केली, तर किरण सामंत यांचेही सतत लक्ष होते.
रत्नागिरीच्या विकासाला चालना
या बस स्थानकामुळे रत्नागिरीच्या प्रवास आणि परिवहन व्यवस्थेला मोठा आधार मिळेल. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि पर्यटनालाही चालना मिळेल. रत्नागिरी आता विकासाच्या नव्या टप्प्यावर आहे, आणि सामंत बंधूंच्या नेतृत्वामुळे हे शहर आधुनिकतेच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
लोकार्पण सोहळा : ११ मे २०२५ रोजी होणारा हा शानदार सोहळा रत्नागिरीच्या विकासातील मैलाचा दगड ठरेल. प्रवाशांना आता अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेता येईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:55 08-05-2025














