रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पावसाळ्यापूर्वी केले जाणारी कामे पूर्ण पूर्ण करावी. तसेच प्रभाग क्रमांक ६ मधील नळ पाणी योजना, भूमिगत गॅस पाइपलाइन, भूमिगत विद्युत वाहिन्या यासाठी खोदण्यात आलेले रस्ते काम पूर्ण झालेल्या परिसरात रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात यावीत, अशी मागणी भारतीय जनता पार्टी आयटी जिल्हा संयोजक नीलेश आखाडे यांनी एका निवेदनातून केली आहे.
नाचणे रोड रस्त्यालगत डांबरी बाजूपट्टा लवकरात लवकर पूर्ण करावा. मारुती मंदिर ते दाते कॉलनी अंतर्गत रस्ता अनेक वर्षे डांबरीकरण न केल्यामुळे नांगरलेल्या जमिनीप्रमाणे झाला असून तो तातडीने करण्यात यावा, जोगळेकर कॉलनी ते दामले विद्यालय रस्त्यालगत असणाऱ्या गटारावरील लाद्या मोडकळीस आल्याने गटार उघडे पडले आहे. याचा त्रास आजूबाजूच्या लोकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना होत असून गटारावर तातडीने लाद्या बसविण्यात याव्यात, आनंद नगर परिसरात खोदकाम करण्यात आलेले रस्ते डांबरीकरण व्हावे, अभ्युदयनगर परिसरातील गटारावर लाद्या बसवून बंदिस्त करावे, सहकार नगर परिसरातील काही ठिकाणी गटारांवरील लाद्या खराब झाल्या आहेत त्या बदलण्यात याव्या व रस्ते डांबरीकरण व्हावेत, अभ्युदय नगरकडून चैत्रबनकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेले पथदिवे पुन्हा बसविण्यात यावे, विश्वनगर येथील अपूर्ण अवस्थेत असलेले उद्यानाचे काम तातडी पूर्ण करण्यात यावे, परिसरातील नागरिकांना या उद्यानामध्ये वावरता येईल, नाचणे पॉवर हाऊस गजानन महाराज मंदिरासमोर तपोवन अपार्टमेंटकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करण्यात यावा, आदी सूचना निवेदनात करण्यात आल्या आहेत.
निवेदनामध्ये नूतननगर परिसरातील समस्यांवर विशेष लक्ष वेधले असून येथे असणारी उघडी गटारे, खोदण्यात आलेले रस्ते, परिसरातील धुळीचे साम्राज्य या सर्वांवर तातडीने उपाययोजना करण्याची विनंती श्री. आखाडे यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 08-05-2025














