रत्नागिरी, ८ मे २०२५ : रत्नागिरीत देशप्रेमाचा अनोखा प्रसंग घडला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ६-७ मे रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. या विजयोत्सवात देशभर जल्लोष सुरू असताना, रत्नागिरीतील एका तरुणाने सोशल मीडियावर पाकिस्तानचे समर्थन करणारे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह स्टेटस ठेवले. या कृत्याने संतापलेल्या देशप्रेमी रत्नागिरीकरांनी त्या तरुणाला चांगलाच चोप देत ‘भारत माता की जय’ म्हणायला लावले.
जिहादी मानसिकतेच्या तरुणाचे कृत्य
रत्नागिरीतील एका प्रसिद्ध आस्थापनेवर काम करणाऱ्या या तरुणाने इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘मोदी किलर आहे’, ‘पाकिस्तानसाठी प्रार्थना करा’ असे स्टेटस ठेवले होते. पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला होता, आणि भारताने त्याला ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर दिले होते. अशा वेळी या तरुणाचे स्टेटस पाहून रत्नागिरीत खळबळ उडाली.
देशप्रेमी रत्नागिरीकरांचा संताप
या स्टेटसची माहिती काही देशप्रेमी तरुणांना मिळताच त्यांनी त्या तरुणाचा शोध घेतला. तो रत्नागिरीतील एका शोरूममध्ये काम करत होता, परंतु व्यवस्थापनाने आक्षेपार्ह स्टेटसमुळे त्याला आधीच कामावरून काढले होते. तरीही, भारतात राहून पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या आणि दहशतवाद्यांचे कौतुक करणाऱ्या या तरुणाला धडा शिकवण्याचा निर्धार रत्नागिरीकरांनी केला. त्यांनी त्या तरुणाला शोधून काढले आणि आपल्या पद्धतीने चांगलाच चोप देत ‘भारत माता की जय’चा नारा देण्यास भाग पाडले. जमावाने केलेल्या मारहाणीत तरुण जखमी झाला आहे. त्याला या अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे.
ऑपरेशन सिंदूर आणि राष्ट्रीय एकता
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत १००हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईने भारताने दहशतवादाविरोधातील आपली कठोर भूमिका जगासमोर मांडली. रत्नागिरीतील या घटनेने स्थानिक पातळीवरही देशप्रेम आणि दहशतवादाविरोधी भावना दृढ असल्याचे दिसून येते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:46 08-05-2025














