रत्नागिरी : जिल्हा नियोजन समिती रत्नागिरी, प्रकल्प संचालक, आत्मा, कृषि विभाग रत्नागिरी व जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्यावतीने दि. १० मे ते १२ मे २०२५ रोजी स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल, आठवडा बाजार, रत्नागिरी येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत रत्नागिरी जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषद व पशु-पक्षी प्रदर्शन २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये आंबा व शेतमाल उत्पादक ते ग्राहक थेट विक्रीचे स्वतंत्र दालन, बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री, विविध जातींचे पशु-पक्षी प्रदर्शन, कृषी व कृषी संलग्र विभागांची स्वतंत्र दालने, अत्याधुनिक कृषी यंत्रे अवजारे यांची स्वतंत्र दालने, कृषी निविष्ठा यांची स्वतंत्र दालने, खवय्यांसाठी रूचकर, अस्सल कोकणी पदार्थांची मेजवानी अशी एकूण १६५ विविध गट, कृषी व कृषी संलग्न विभागांची प्रशस्त दालने असणार आहेत. या महोत्सवात दालनांमध्ये प्राधान्याने जिल्हयातील शेतकरी व बचतगट यांना मोफत दालने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन दि. १० रोजी सकाळी १०.०० वाजता राज्याचे कृषिमंत्री, अॅड. माणिकराव कोकाटे, उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमासाठी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, योगेश कदम, राज्यमंत्री, गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, डॉ. संजय भावे, कुलगुरू, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रसाद लाड, निरंजन डावखरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. भास्क जाधव, आ. शेखर निकम, आ. दीपक केसरकर, अध्यक्ष, सिंधुरत्न समृध्द योजना, आ. किरण (भैया) सामंत, सदस्य, सिधुरत्न समृद्ध योजना यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवसीय या महोत्सवात कृषी व कृषी संलग्र विविध योजनांची माहिती व प्रात्यक्षिके या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रदर्शित केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी यांनी या कार्यक्रमास अवश्य भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी शिवकुमार सदाफुले व प्रकल्प संचालक, आत्मा, विजय बेतीबार यांनी केले आहे.
शेतकरी सन्मानासह विविध स्पर्धा
याबरोबरच जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान, कृषी विषयक विविध परिसंवाद इ. कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे. दि. १० रोजी पौष्टिक तृणधान्ये पाककला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. दि. १० मे व ११ रोजी सायं. ७ वा. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. ११ रोजी सायं. ६ वा. कृषी पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 09/May/2025














