रत्नागिरी : सध्या नवरा-बायकोमध्ये विविध कारणांवरून वाद होण्याच्या घटना वाढल्या आहेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढलेल्या असून बरेचदा त्यांना कौटुंबिक त्रासालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या महिलांना दाद मागता यावी, या उद्देशाने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात भरोसा कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. हा कक्ष केवळ महिलांच्याच तक्रारी सोडवत नाही तर पुरुषांनी केलेल्या तक्रारींचीही सोडवणूक करतो.
गेल्या चार महिन्यांत या कक्षात ११ पुरुषांनी महिलांच्या छळाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. पती-पत्नीमधील वादाचे प्रमुख कारण सोशल मीडिया ठरू लागले आहे. त्यामुळे मोबाईलवर, सोशल मीडियावर तासन्तास वेळ घालविणे, नोकरी-व्यवसायामुळे एकमेकांना वेळ न देणे यातूनच एकमेकांवर संशय घेणे, विवाहबाह्य संबंध, व्यसनाधीनता ही कारणे आहेतच, पण दोघांमध्ये अहंकार असल्याने यात माघार कुणी घ्यायची, हाही प्रश्न असतो. त्यामुळे काहीवेळा घटस्फोट घ्यायचाय, या अंतिम निर्णयाप्रत पोहोचलेली दांपत्ये शेवटचा प्रयत्न म्हणून भरोसा सेलकडे जातात. अशा विविध प्रकारच्या महिला आणि पुरुषांच्या मिळून ५३ तक्रारी या कक्षात दाखल झाल्या.
मात्र, भरोसा कक्षातील महिला अधिकारी आणि त्यांच्या सहकारी यांच्याकडून एकमेकांबद्दल तक्रारी असलेल्या जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांचे मतपरिवर्तन करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे घटस्फोटापर्यंत निर्णय घेतलेल्यांचे संसार नव्याने जोडले जात आहेत. गेल्या चार महिन्यांत भरोसा सेलने अशा १९ जणांचे तुटत असलेले संसार सावरण्याचे काम केले आहे.
भरोसा सेलकडे चार महिन्यांत ५३ तक्रारी
येथील भरोसा कक्षात जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत महिला आणि पुरुषांच्या एकूण ५३ तक्रारी आल्या.
महिलांकडूनही छळ होत असल्याच्या तक्रारी
पत्नीकडूनही पतीला विविध प्रकारे त्रास होतो. संशयही घेतला जातो. अशाही ११ तक्रारी दाखल या कक्षात आल्या आहेत.
पाच प्रकरणांत समझोता
भरोसा कक्षात समुपदेशनाने संसार जोडले जातात. गेल्या चार महिन्यांत या कक्षाने महिलांच्या १७ आणि पुरुषांच्या ३ प्रकरणात समझोता घडवून आणला.
येथील भरोसा कक्षात पती-पत्नी किंवा कौटुंबिक तक्रारी दाखल होत असतात. अशांचे समुपदेशन करून त्यांच्यातील वाद मिटवून त्यांचे संसार जोडले जातात. गेल्या चार महिन्यांत तुटू पाहणारे १९ संसार भरोसा कक्षाने समुपदेशनाने सावरले आहेत. –जयश्री गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:50 PM 13/May/2025













