रत्नागिरी : शीळ धरण ते जॅकवेल पर्यंतच्या पाईपलाईन कामाला सुरुवात

रत्नागिरी : शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची सुमारे ५४ लाख रुपये खर्चाची साडेसहाशे मीटर लांबीची पाईपलाईन टाकण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. ठेकेदाराकडून या कामात बरीच दिरंगाई झाली होती. आता पावसाळा तोंडावर आल्यानंतर ठेकेदाराने हालचाल करत कामाला सुरुवात केली आहे.

पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक असलेली खोदाई पूर्ण झाली असून, मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात न झाल्यास मे अखेरीस हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. अन्यथा, गतवर्षीप्रमाणे पाण्याची पाईपलाईन पुन्हा वाहून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

शीळ धरण येथे सध्या तात्पुरता उपाय म्हणून तयार करण्यात आलेल्या सहा तरंगत्या पंपांद्वारे (फ्लोटिंग पंप) शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, या पंपांच्या वीज बिलापोटी पालिकेला दरमहा १० ते १२ लाख रुपये खर्च येत आहे. वर्षाचा विचार केल्यास, ५४ लाखांच्या कामासाठी पालिकेने आतापर्यंत सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले आहेत.

पावसाळा अगदी जवळ आल्यानंतर आता ठेकेदाराला जाग आली असून, रखडलेले पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शीळ धरण जॅकवेल कोसळल्यामुळे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून फ्लोटिंग जेटीवर पंप बसविण्यात आले होते. सुधारित पाणीपुरवठा योजनेत शीळ धरण ते जॅकवेलपर्यंत सुमारे साडेसहाशे मीटरची पाईपलाईन टाकण्याचा समावेश आहे. मात्र, वर्षभर या कामासाठी अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत. गेल्या पावसाळ्यापूर्वी पाईपलाईन टाकण्याचे काम अर्धवट राहिले आणि मुसळधार पावसामुळे टाकलेले पाईप वाहून गेले, ज्यामुळे पालिकेचे मोठे नुकसान झाले. हे काम सुमारे ५४ लाख रुपयांचे होते.

आता दुसरा पावसाळा तोंडावर असताना पालिकेने हे काम पुन्हा हाती घेतले आहे. परंतु, या ५४ लाखांच्या रखडलेल्या कामासाठी पालिकेने वर्षभरात सुमारे दीड कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे, येत्या पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:34 PM 09/May/2025