रत्नागिरी : कोतवडे येथे महालक्ष्मी मंदिराचा जिर्णोद्धार उत्साहात

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथे गावची स्वयंभू आणि जागृत ग्रामदेवी श्री महलक्ष्मीदेवीच्या नूतन मंदिराच्या कलशांची शोभायात्रा कोतवडेवासियांनी मोठ्या उत्साहात काढली. चित्ररथ, पारंपरिक वेशभूषा आणि पारंपरिक वाद्यांचा गजर करत ग्रामस्थ मोठ्या उत्साहात या शोभायात्रेत सहभागी झाले होते. श्री महालक्ष्मी मंदिरापासून ते सनगरेवाडीमधील चिखलबावपर्यंत आणि पुन्हा मंदिरापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली.

श्री महालक्ष्मी मंदिराच्या येथून श्री महालक्ष्मीदेवीचा जयघोष करत शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेत ठिकठिकाणी भगवे ध्वज घेऊन ग्रामस्थ सहभागी झाले. प्रत्येक वाडीतील महिला आणि पुरुषांनी समान परिधान केलेली पारंपरिक वेशभूषा हे शोभायात्रेचे आकर्षण ठरले. ढोलपथक, महिलांचे लेझीम तसेच उंबरवाडीतील ग्रामस्थांनी वाघासह देवी असलेला चित्ररथ साकारला. कुंभारवाडीतील ग्रामस्थांनी संत गोराकुंभार आणि श्री विठ्ठलाची प्रतिमा असलेला विशेष चित्ररथ साकारला. गावणवाडी येथील महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन शोभायात्रेत सहभागी झाल्या. सनगरेवाडीतील ग्रामस्थांनीही चित्ररथ साकारला. छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्रीराम यांच्या परिधान केलेल्या वेशभूषा शोभायात्रेचे आकर्षण ठरले.

ग्रामस्थांचा भक्तीभावपूर्वक सहभाग
सकाळी मंदिरात विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला. गावणवाडीमधील ग्रामस्थांनी मंदिराच्या मुख्यद्वाराला तोरण बांधले. मंदिराला फुलांनी सजवणे, रांगोळी घालणे, धार्मिक विधींची सिद्धता करणे आदी विविध सेवेत गावातील सर्व वाड्यांमधील ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सकाळी मंदिरामध्ये संप्रोक्षणविधी, सायंकाळी राक्षोघ्नयाग पार पडला. वेदमूर्ती प्रभाकर जोगळेकर, मंदार घारपुरे, विजयानंद वझे आदी पुरोहितांनी मंदिरांतील सर्व धार्मिक विधी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 10-05-2025