गुहागर : वाकी येथे घराला विद्युत वाहिन्यांचा धोका

गुहागर : गुहागर तालुक्यातील वाकी येथील रहिवासी पांडुरंग सोलकर यांच्या घरावरून विद्युत वाहिन्या घराला चिकटलेल्या अवस्थेत आहेत. या विद्युत वाहिन्यांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने या विद्युत वाहिन्या महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी यांनी लवकरच काढाव्यात, अशी मागणी केली आहे.

गुहागर तालुक्यातील वाकी गावचे पांडुरंग सोलकर हे रहिवासी आहेत. त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, सप्टेंबर २०२४ मध्ये माझ्या घरावरून जाणाऱ्या थ्री फेज तारांमुळे माझ्या संपूर्ण घरामध्ये शॉक आला होता. याबाबत आपण महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी शृंगारतळी कार्यालयाकडे संपर्क साधला असता त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात विद्युत वाहिन्या खेचून दिल्या होत्या. त्यानंतर दोन वीज खांबांच्या दरम्यान एक एक वीज खांब पोल टाकण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानुसार जानेवारी २०२५ मध्ये दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कर्मचारी एक जमिनीमध्ये खड्डा खणून निघून गेले. तेव्हापासून आजपर्यंत विद्युत मंडळ कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे काम करण्यात आलेले नाही.

याबाबत संबंधित कार्यालयांकडे पांडुरंग सोलकर यांनी वारंवार विचारणा करूनही कोणतीच दखल घेतली नाही. दरम्यान सद्यस्थितीत विद्युत वाहिन्यांच्या भारामुळे वीजखांब पुन्हा वाकले असून पांडुरंग सोलकर यांच्या घरावरील व अंगणावरील विद्युत तारा पुन्हा खाली आलेल्या आहेत. या विद्युत तारांमुळे आमच्या व गावातील लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून येथे नवीन विद्युत पोल बसवावे व होणारी जीवित हानी टाळावी असे पांडुरंग सोलकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 10/May/2025