Virat Kohli announces retirement from Test cricket : क्रिकेट जगतातून मोठी बातमी समोर येत आहे. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटने ही मोठी घोषणा केली आहे.
कोहलीने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे कसोटीतून निवृत्तीची माहिती दिली. अलिकडेच रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले. रोहितच्या निवृत्तीच्या पाच दिवसांनंतर, विराट कोहलीनेही क्रिकेटच्या सर्वात जुन्या फॉरमॅटला निरोप दिला. अशाप्रकारे, या स्टार फलंदाजाच्या 14 वर्षांच्या प्रदीर्घ युगाचा अंत झाला आहे.
विराट कोहली शेवटच्या संदेशात काय म्हणाला?
कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू रंगाचा पोशाख घालून मी 14 वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा लागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली, मला घडवले आणि आयुष्यभर मला लक्षात राहतील असे धडे शिकवले.
पांढऱ्या पोशाखात खेळणे हे नेहमीच्या माझ्यासाठी खास राहिले आहे. शांत खेळ, लांब दिवस, छोटे क्षण जे कोणीही पाहत नाही पण ते कायम तुमच्यासोबत राहतात. मी या फॉरमॅटमधून बाहेर पडताना, ते सोपे नाही – पण हा निर्णय मला बरोबर वाटतो. मी माझ्याकडे जे काही होते ते सर्व दिले आहे आणि या फॉर्मेटने मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त परत दिले आहे.
मी कृतज्ञतेने भरलेल्या हृदयाने इथून निघत आहे – खेळासाठी, मी ज्या लोकांसोबत खेळलो त्यांच्यासाठी आणि वाटेत मला दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी.
मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमीच हसतमुखाने पाहतो.
#269, साइनिंग ऑफ.
2014 मधल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात सांभाळलेली कर्णधारपदाची धुरा
ॲडलेडमध्ये खेळवण्यात आलेल्या डिसेंबर 2014 मध्ये सुरू झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी पहिल्यांदाच दुखापतग्रस्त धोनीऐवजी कर्णधारपदाची सुत्र कोहलीच्या हाती दिली गेली. सामन्यात कोहलीनं पहिल्या डावात 115 धावा केल्या. कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात शतक करणारा तो चौथा भारतीय कर्णधार होता. दुसऱ्या डावात पाचव्या दिवशी भारतासमोर विजयासाठी 364 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आलं. भारताची धावसंख्या 2 गडी बाद 57 असताना कोहली फलंदाजीस आला आणि त्वेशानं फलंदाजी करू लागला. त्याने मुरली विजयसोबत तिसऱ्या गड्यासाठी 185 धावांची भागीदारी केली. पण, त्यानंतर 242/2 अशा सुस्थितीतून भारताचा डाव 315 धावांवर आटोपला. 175 चेंडूत 141 धावा करून कोहली सामन्यातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्यावेळी कोहली म्हणालेला की, “संघानं सामना अनिर्णित ठेवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठीच प्रयत्न केलेले, मी सहभागी झालेली सर्वोत्तम कसोटी होती.”
विराट कोहलीची कसोटी कारकीर्द
विराट कोहलीने जून 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध पहिला सामना खेळला होता. विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकीर्दीत एकूण 123 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये 210 डावांमध्ये विराट कोहलीने 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या आहेत. यामध्ये 30 शतकं आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा एक यशस्वी कर्णधार होता आणि त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ग्रेग चॅपलनंतर कसोटी कर्णधारपदाच्या पदार्पणात दुहेरी शतके करणारा विराट कोहली एकमेव दुसरा क्रिकेटपटू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:09 12-05-2025
