उन्हाळी सुट्टीसाठी चाकरमान्यांनी धरली कोकणची वाट.. कोकण रेल्वे हाऊसफुल्ल!

चिपळूण : उन्हाळी सुट्टी सुरु झाल्याने चाकरमान्यांनी कोकणची वाट धरल्याने कोकण रेल्वे हाऊस फुल्ल झाली आहे. कोकणाकडे येणाऱ्या – अनेक गाड्या मोठ्या प्रमाणावर भरुन येत असल्याने कोकणातील सर्वच रेल्वे स्थानके आणि मुंबई रेल्वे स्थानकांवर – चाकरमान्यांची मोठी गर्दी दिसत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने अनेकांची गैरसोय झाली. याचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी प्रवाशांकडून ज्यादा भाडे घेतले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

येत्या १७ मेपर्यंत सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मागील वर्षीच्या मानाने कोकण रेल्वेच्या उन्हाळी विशेष गाड्या कमी असल्याने चाकरमान्यांना आता एसटी आणि खासगी बसचा आधार घ्यावा लागत आहे. तसेच काही चाकरमानी स्वतःच्या खासगी वाहनाने कोकण गाठल्याने मुंबई गोवा महामार्गावरील काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. कोकण रेल्वे, एसटी गाड्याचे आरक्षण उपलब्ध होत नसल्याने अनेकांनी खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र खासगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक प्रवाशांच्या गरजेचा फायदा उठवत असल्याने ७०० रुपये भाडे असलेल्या ठिकाणी १ हजार ते १५०० रु. भाडे आकारणी करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 12/May/2025