विमुक्त, भटक्या जमातीच्या राष्ट्रीय नेतेपदी मंत्री संजय राठोड यांची निवड

यवतमाळ : शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जमाती (डीएनटी) समाजाच्या सक्षमीकरणासाठी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांची राष्ट्रीय नेते म्हणून निवड केली.

या नियुक्तीनंतर शुक्रवारी दि.२६ जून रोजी मंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळ निवासस्थानी सर्व समाज घटकातील प्रतिनिधींनी एकत्र येत त्यांचा पारंपरिक पद्धतीने सत्कार केला.

देशातील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या मोठ्या सामाजिक घटकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याच्या व्यापक दृष्टिकोनाचा भाग आहे. देशभरात विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या समाजाची लोकसंख्या अंदाजे १० ते १२ कोटी असून एकट्या महाराष्ट्रात हा आकडा जवळपास दीड कोटी इतका आहे. एवढी मोठी लोकसंख्या असूनही हा समाज आजही शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवास, जातप्रमाणपत्र, आरक्षण आणि मूलभूत सुविधांपासून मोठ्या प्रमाणावर वंचित आहे.

महाराष्ट्रातील डीएनटी प्रवर्गामध्ये बंजारा, लमाण, बेरड, रामोशी, भामटा, कंजारभाट, पारधी (फासे पारधी, टाकणकर व इतर उपगट), वडार, कैकाडी, राजपूत भामटा, गोसावी, नाथपंथी गोसावी, बेलदार, गारुडी, घिसाडी / गाडी लोहार, गोल्ला, गोंधळी, गोपाळ, जोशी, कोल्हाटी, डोंबारी, नंदीवाले, वैदू, वासुदेव, बहुरूपी, शिकलगार, सिकलीगर यांसह इतर अनेक समाजांचा समावेश होतो. या सर्व समाजांना एकत्रित नेतृत्व आणि एका सक्षम संघटनेची मोठी आवश्यकता होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या समाजाच्या प्रश्नांची गंभीर दखल घेऊनच ही महत्त्वपूर्ण जबाबदारी मंत्री संजय राठोड यांच्यावर सोपविली आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना न्याय मिळून या घटकांची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती होईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले. याप्रसंगी प्रामुख्याने शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हरीहर लिंगनवार, श्रीधर मोहोड, जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, यशवंत पवार, समन्वयक संजय हातगावकर, युवासेना जिल्हा प्रमुख प्रद्युम्न जवळकर, आदिवासी आघाडीचे सुरेश चिंचोळकर, संजय सल्लेवाड, सचिन महल्ले, नीलेश बेलोकार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:32 27-06-2026