लांजा महामार्ग वाहतूक कोंडी: सार्वजनिक रस्त्यावर वाहने उभी करून अडथळा आणणाऱ्या दोन चालकांवर गुन्हे दाखल

लांजा: मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लांजा महामार्ग वाहतूक कोंडी आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बेजबाबदार प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी लांजा येथील सार्वजनिक रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त उभी करून अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या वाहनचालकांवर लांजा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २५ जून रोजी दुपारी हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

लोकमान्य वस्तू भांडारासमोर इनोव्हा कार उभी करून अडथळा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात रवींद्र दामले (वय ३७, रा. कोळंबे, खालचा पाट, ता. रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीने एमएच-०८-ईएन-२५५१ क्रमांकाची आपली इनोव्हा कार २५ जून रोजी दुपारी २.२० वाजण्याच्या सुमारास लांजा येथील लोकमान्य वस्तू भांडारासमोर सार्वजनिक रस्त्यावरच उभी केली होती. यामुळे महामार्गावरील इतर वाहनांच्या वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण झाल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

काही मिनिटांच्या अंतराने वॅगनआर चालकावरही कारवाई याच कारवाई दरम्यान, अवघ्या दहा मिनिटांच्या अंतराने दुसऱ्या एका चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला. समीर संतोष पांचाळ (वय २७, रा. पुनस, सुतारवाडी, ता. लांजा) असे या दुसऱ्या संशयित चालकाचे नाव आहे. त्याने आपली एमएच-०४-एफएफ-४९८६ क्रमांकाची वॅगनआर कार दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास त्याच ठिकाणी म्हणजेच लोकमान्य वस्तू भांडारासमोरील सार्वजनिक रस्त्यावर उभी केली होती. महामार्गावर निष्काळजीपणे वाहन पार्क करून वाहतुकीस अडथळा आणल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास लांजा पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 27-06-2026