माझी १५ महिन्यांची नात रोज मोदींची पूजा करते!; अभिनेते सुनील शेट्टींचं वक्तव्य

मुंबई: बॉलिवूडचे अण्णा म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी सध्या त्यांच्या आगामी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटामुळे आणि वैयक्तिक आयुष्यातील एका विधानामुळे जबरदस्त चर्चेत आले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपली १५ महिन्यांची नात इवारा हिच्याबद्दल एक अत्यंत रंजक आणि भावनिक खुलासा केला आहे. सुनील शेट्टी नात इवारा ही अवघ्या १५ महिन्यांची असतानाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रोज सकाळी अत्यंत आवडीने पूजा करते आणि त्यांच्या फोटोला लाडू भरवते, असा थक्क करणारा दिनक्रम स्वतः सुनील शेट्टी यांनी जाहीरपणे मांडला आहे.

साईबाबांच्या पुस्तकातील फोटो आणि रोजची पूजा अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू के. एल. राहुल यांची मुलगी असलेल्या इवाराचा जन्म २४ मार्च २०२५ रोजी झाला. आपल्या लाडक्या नातीचा हा अनोखा किस्सा सांगताना सुनील शेट्टी म्हणाले, “तुम्हाला विश्वास बसणार नाही पण माझी नात फक्त १५ महिन्यांची आहे. एकदा सहज कोणीतरी तिला एअरपोर्टच्या परिसरात असलेला पंतप्रधान मोदींचा फोटो दाखवला होता. त्यानंतर आमच्या घरातील साईबाबांच्या एका पुस्तकात मोदीजींचा मोठा फोटो ठेवलेला आहे. ती चिमुरडी रोज सकाळी न विसरता ते पुस्तक स्वतः घेते आणि ‘मोदीजी मोदीजी’ म्हणत थेट त्यांची पूजा करायला बसते.”

गणपती बाप्पाचा लाडू थेट मोदींच्या फोटोला नातीचा हा गोंडस आणि अद्भूत भाव स्पष्ट करताना सुनील शेट्टी पुढे म्हणाले, “घरात एक गणपती बाप्पाची मूर्ती आहे. इवारा त्या मूर्तीजवळचा लाडू उचलते आणि थेट मोदींच्या फोटोला भरवते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला घरातल्या कोणीही असं करायला सांगितलेलं नाही. तिला फक्त ‘हे मोदीजी आहेत’ एवढंच एकदा दाखवलं होतं. त्यांना मोदीजी म्हणायचं हे देखील तिला कोणी शिकवलं नव्हतं. पण, यात नक्कीच काहीतरी जादू (मॅजिक) आहे आणि असं करणारी ती एकटीच नाही; मोदींमध्ये खरोखरच मॅजिक आहे, असं मला वाटतं.”

पक्षाचा नाही, तर देशाच्या नेत्याचा फॅन! या मुलाखतीदरम्यान सुनील शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे जोरदार कौतुक केले. ते म्हणाले, “मी नेहमीच हे उघडपणे म्हटलं आहे की मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खूप मोठा फॅन आहे. मी येथे कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाबद्दल बोलत नाहीये, तर मी एका लीडरबद्दल (नेत्याबद्दल) बोलतोय. एक उत्तम लीडर म्हणून ते मला नेहमीच प्रभावित करतात. जेवढं प्रेम मी माझ्या देशावर करतो, तेवढंच प्रेम आणि आदर मी त्यांच्यावरही करतो.” सध्या सोशल मीडियावर सुनील शेट्टींची ही मुलाखत आणि त्यांच्या आगामी ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:04 27-06-2026