लांजा : मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या पाली बस स्थानकात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून सातत्याने होणाऱ्या वाढत्या चोरीच्या घटनांने प्रवासीवर्ग पुरता हैराण झाला आहे. पाली बस स्थानकात सीसीटीव्ही नसल्याचा फायदा चोरट्यांनी उठवला आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर सिसीटीव्ही अभावी चोरट्यांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान आहे.
मुंबई गोवा महामार्गावर लांजा आणि रत्नागिरी तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पाली बस स्थानक आहे. काहीच महिन्यांपूर्वी या बस स्थानकाचे दिमाखादार उद्घाटन करण्यात आले होते. पालकमंत्री उदय सामंत यांच्या होमपिचवर असलेल्या पाली बसस्थानकात मात्र सीसीटीव्हीची सुविधा उपलब्ध नसल्याने गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. सध्या मे महिन्याचा हंगामामुळे गावागावात दाखल झालेल्या मुंबईकर चाकरमान्यांमुळे पाली बसस्थानकात गर्दी आहे. अशावेळी चोरट्यांनी डोके वर काढले आहे. सीसीटीव्ही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांचे मंगळसूत्र अन्य दागिने तसेच पाकिटमारीच्या घटना घडत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वाढत जाणाऱ्या या चोरीच्या घटनांनी प्रवासीवर्ग पुरता हैराण झाला आहे अनेक प्रवाशांनी याबाबत येथील कंट्रोल केबिन तसेच पाली पोलीस स्टेशन यांच्याकडे देखील तक्रारी केल्या आहेत. मात्र सीसीटीव्ही नसल्याने चोरट्यांचा माग कसा काढायचा असा प्रश्न देखील एसटी प्रशासन आणि पोलिसांसमोर आहे.
अशाप्रकारे पालकमंत्र्यांच्या होमपिच असलेल्या पाली बस स्थानकात सीसीटीव्ही नसल्याने प्रवासी वर्गातून देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बसस्थानकात सीसीटीव्हीची व्यवस्था करणे अपेक्षित होते मात्र सीसीटीव्ही नसल्याचा गैरफायदा फायदा चोरट्याने उठवण्यास सुरुवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी पुणे येथे घडलेल्या घटनेनंतर बस स्थानकात सीसीटीव्ही असणे किती गरजेचे आहे ही बाब अधोरेखित झाली होती. मात्र मुंबई गोवा महामार्गावर वसलेल्या पाली बसस्थानकात अद्यापही सीसीटीव्ही नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
त्यामुळे लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पाली बसस्थानकात सीसीटीव्ही बसवावेत आणि चोरीच्या घटनांना आळा घालावा अशी प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 12/May/2025
