पालीत विद्यार्थ्यांनी अनुभवला शून्य सावली अनुभव

पाली : शून्य सावली दिवस हा खगोलीय अविष्कार आज दुपारी पालीतील विद्यार्थ्यांनी अनुभवला आहे. अनेकांनी उन्हात उभे राहून अथवा वस्तू ठेवून तिची सावली पडत नसल्याचा हा अनुभव घेतला.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. उदय पाखरे यांनी सांगितले की, “शून्य सावली या दिवशी पृथ्वीवर +23.5° आणि -23.5° अंश (किंवा 23.5° उ. आणि 23.5°द.) अक्षांश दरम्यानच्या ठिकाणी सुर्य येतो तेव्हा दरवर्षी दोनदा हा अनुभवता येतो. या दोन दिवशी, सूर्य दुपारच्या वेळी त्या ठिकाणी अगदी डोक्यावर येतो आणि जमिनीवर वस्तूची सावली पडत नाही. इतर दिवशी रोज दुपारच्या वेळी सूर्य कधीच डोक्यावर नसतो, तो थोडा उत्तरेकडे किंवा थोडा दक्षिणेकडे सरकलेला असतो. पृथ्वीवर +23.5 आणि 23.5 अंश अक्षांश दरम्यानच्या ठिकाणांसाठी, सूर्याची अवकाशातील क्रांती (सूर्याचे खगोलावरील स्थान सांगणारा एक निर्देश बिंदू) दोनदा त्या ठिकाणांच्या अक्षांशाच्या एवढी असते. एकदा उत्तरायणादरम्यान आणि एकदा दक्षिणायनादरम्यान या दोन दिवशी, सूर्य दुपारच्या (मध्यान) वेळी अगदी डोक्यावर असतो आणि जमिनीवर वस्तूची सावली पडत नाही. यालाच शून्य सावली म्हणतात.”

प्राजक्ता काटकर आणि वेदा मिरजकर पाली येथे हा खगोलीय आविष्कार जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाणीज स्कूलची प्राजक्ता समीर काटकर इयत्ता सहावी व जि.प. आदर्श विद्यामंदिर पाली नं. १ च्या वेदा ज्ञानेश मिरजकर इयत्ता चौथी या विद्यार्थिनींनी शून्य सावली अनुभवली आहे. आज दुपारी १२ वाजून ३३ मिनिटांनी (भारतीय प्रमाण वेळेनुसार) याची प्रचिती आली. पालीचे अक्षांश १६.९६ उ. आणि रेखांश ७३.४८ पू. असल्याने मे महिन्यात ही घटना घडली. ५ ऑगस्ट रोजी सुद्धा पुन्हा हिच खगोलीय घटना पाहता येईल पण आपल्याकडे पावसाळा असल्यामुळे आपण या घटनेपासून बहुतेक वेळा वंचित राहतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:33 PM 12/May/2025