संगमेश्वर : तालुक्यातील ओझरे खुर्द गणेशवाडी येथे एका बंद घराचे कुलूप उघडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 34 हजार 300 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत सोन्या-चांदीचे पूजेचे दागिने तसेच दोन गॅस सिलेंडर असा माल चोरून नेण्यात आला आहे. देवरुख पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विजय मनोहर जागुष्टे (वय 61) हे घर बंद करून बाहेरगावी गेले होते. 12 एप्रिल ते 8 मे या कालावधीत त्यांच्या अनुपस्थितीत चोरट्यांनी घराजवळील इलेक्ट्रिक बोर्डवर ठेवलेली चावी किंवा डुप्लिकेट चावी वापरून घराचे कुलूप उघडले. घरात प्रवेश करून त्यांनी चांदीचे ताम्हण, तांब्या, पंचपली, छत्री, हार, मोदक, जास्वंद फुल, पंचारती, दोन निरंजन, गणेश मूर्ती, बाळकृष्ण मूर्ती, फुलपात्र, दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे जानवे आणि एक भरलेला व एक रिकामा सिलेंडर असा ऐवज चोरून नेला.
ही घटना समजताच जागुष्टे यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर 11 मे रोजी दुपारी 1.06 वाजता अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 च्या कलम 331(1), 331 (4) व 305 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 12/May/2025
