प्रणव पोळेकर यांच्या निवेदनाची पालकमंत्र्यांकडून दखल; गोपाळगड शासनाच्या ताब्यात घेण्याचे संकेत

चिपळूण : गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील ऐतिहासिक आणि शिवकालीन गोपाळगड किल्ला लवकरच राज्य सरकारच्या ताब्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर किल्ला शासनाच्या ताब्यात घेण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली आहे.

गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर यांनी गोपाळगड किल्ला महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग आणि महसूल विभागाच्या नावे करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची तत्काळ दखल घेत पालकमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे.

ऐतिहासिक वारशावर खाजगी मालकीचे सावट

गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे वसलेला गोपाळगड हा शिवकालीन इतिहासाचा महत्त्वपूर्ण वारसा मानला जातो. मात्र, महसूल अभिलेखातील काही तांत्रिक त्रुटींमुळे या किल्ल्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर काही स्थानिकांच्या नावावर झाली आहे. त्यामुळे सध्या किल्ल्याच्या परिसरात संबंधित व्यक्तींची वहिवाट असून तेथे आंब्याची बागायतीदेखील करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना स्थानिकांकडून विरोध करण्यात आल्याची घटना घडली होती. “हा किल्ला आमच्या मालकीचा आहे” असे सांगत पर्यटकांना रोखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता.

अनेक वर्षांपासून सुरू आहे पाठपुरावा

गोपाळगड किल्ला शासनाच्या ताब्यात यावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक ग्रामस्थ, शिवप्रेमी, विविध सामाजिक संस्था आणि स्थानिक वृत्तपत्रे सातत्याने प्रयत्न करत आहेत. या पाठपुराव्यामुळे बहुतांश कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या असल्याचे सांगितले जाते.

तथापि, पुरातत्व विभाग आणि महसूल विभागाच्या स्तरावरील काही अंतिम प्रशासकीय प्रक्रिया अद्याप प्रलंबित असल्याने किल्ला प्रत्यक्षात शासनाच्या ताब्यात आलेला नाही. त्यामुळे राज्य संरक्षित स्मारक असलेला हा ऐतिहासिक किल्ला आजही खाजगी वहिवाटीच्या छायेत असल्याची खंत इतिहासप्रेमी व्यक्त करत आहेत.

प्रणव पोळेकर यांची ठोस मागणी

सभापती प्रणव पोळेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दिलेल्या पत्रात या विषयात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती केली होती. गोपाळगड किल्ला खाजगी मालकीतून मुक्त करून शासनाच्या अखत्यारीत आणण्यासाठी पुरातत्व आणि महसूल विभागामार्फत अंतिम प्रक्रिया गतीमान करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

या मागणीवर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे स्पष्ट केले. तसेच या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

इतिहासप्रेमींमध्ये समाधान

पालकमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे इतिहासप्रेमी, शिवभक्त आणि स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गोपाळगड किल्ला शासनाच्या ताब्यात आल्यानंतर त्याचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी नवे मार्ग खुले होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशातील महत्त्वाचा दुवा असलेला गोपाळगड आता अखेर शासनाच्या संरक्षणाखाली येणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.