Maharashtra Weather Update: मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना पुढील तीन दिवस अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : Maharashtra Weather Update: राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (मंगळवारी) मुंबई,पुण्यासह काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबईला आज (मंगळवार) आणि उद्या (बुधवार)साठी ‘यलो ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

ठाणे आणि मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून दक्षिण कोकणामध्येही ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांच्या घाट परिसरात पावसाचा ॲलर्ट देण्यात आला आहे.

आज मान्सून अंदमानमध्ये येण्याचा अंदाज

नैऋत्य मोसमी पाऊस आज (मंगळवारी ता 13 मे) अंदमान – निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. त्या भागात जोरदार पाऊस सुरू झाला असून पुढील चोवीस तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच, पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही येईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. चोवीस तासांत निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे त्या ठिकाणी अवघ्या काही तासांत मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने काल (सोमवारी) दिला. दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात सोमवारी (दि.12 मे) सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच, 13 आणि 14 मे रोजी राज्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह वळिवाच्या पावसाची शक्यता आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा ‘ॲलर्ट’

राज्यातील कोकण-गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील दोन दिवसांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वारे वाहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. कोकण-गोव्यात मंगळवारी (ता. 13 ) आणि बुधवारी (ता. 14 ) हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. पुणे आणि घाट विभाग, कोल्हापूर आणि घाट विभाग, सातारा, सांगली, बीड, धाराशीव येथे तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे.

पुण्यात चार दिवस ‘येलो’ अलर्ट

पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे, तर पुढील चार दिवसांत कमाल तापमानामध्ये किंचित घट होणार असून मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे पुणे शहराला पुढील चार दिवस ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने बुधवार 14 आणि गुरूवार 15 मे साठी विदर्भातील गोंदियाभंडारा, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसह विदर्भात येणारे दोन ते तीन दिवस जोरदार अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे. उन्हाळ्यात खासकरून मे महिन्यात विदर्भात उत्तरेकडून पश्चिमेकडे उष्ण वारे वाहतात. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून वाऱ्याची दिशा बदलली असून वेग देखील वाढलेला आहे. त्यामुळे वातावरणात पावसासाठी पोषक द्रोनिका तयार झाल्या आहे. ज्यामुळे विदर्भात काही जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह तुरळक आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे. पुढील दोन दिवस मात्र विदर्भातील आकाशात ढग दाटलेली असतील. बुधवारी आणि गुरुवारी विदर्भातील काही जिल्हात मुसळधार पावसाची दाट शक्यता असल्याने हवामान विभागाने पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नाशिक शहरासह त्रंबकेश्वरमध्ये अवकाळी

नाशिक शहरासह त्रंबकेश्वरला आज अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढलं. दिवसभरात नाशिक शहरात 21 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शहराच्या रस्त्यावरून पाणी वाहत होते, त्यांनतर सायंकाळी त्रंबकेश्वरच्या रस्त्यानाही नदीचे रूप प्राप्त झाले होते. दरवर्षी पावसाळ्यात त्रंबकेश्वरच्या रस्त्यावरून पाणी वाहताना बघायला मिळते. मात्र, यंदा मे महिन्यातच रस्त्याने नदी नाल्याचे रूप आले होते, त्यामुळे नाशिक शहरा बरोबर त्रंबकेश्वर मधील मान्सून पूर्व नालेसफाईच्या कामाची पोलखोल झाली आहे, त्रंबकेश्वर मधील रस्त्यावर पाणी वाहत असल्यानं वाहने देखील अडकून पडली होती, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाणी ओसरण्यास सुरवात झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 13-05-2025