गुहागर : नव्या मुद्रांक नियमामुळे जमिनीचे व्यवहार ठप्प

गुहागर : भूमी अभिलेख कार्यालयातून मोजणी नकाशे जोडल्याशिवाय ‘मुद्रांक कार्यालयात जमीन व्यवाहार नोंदवले जाणार नाहीत, असा बदल नव्या कायद्यात झाल्यानंतर सर्वच जिल्ह्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहार ठप्प झाले आहेत. या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना आल्यानंतर कामकाज सुरळीत होईल, असे मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र जमिनींचे व्यवहार करणाऱ्या दलालांवर उपासमारीची वेळ येणार हे मात्र निश्चित !

ज्या क्षेत्रातील जमिनीचा व्यवहार आहे, त्या क्षेत्रातील गटाची संपूर्ण मोजणीचा नकाशा जोडल्याशिवाय नव्या कायद्याने जमीन व्यवहार करता येणार नाहीत. १९०८ च्या कायद्यात काही बदल करण्यात आले असून सामाईक जागेबाबत तसेच गुंठेवारीसारख्या भागातील चतुःसीमांची कागदपत्रे घ्यावीत, अशा सूचना देण्यात आल्याने गेल्या चार दिवसांपासून मुद्रांक दस्त नोंदणीचे काम ठप्प झाले आहे. राज्य वा केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी जमीन खरेदी विक्री करण्यास मज्जाव करण्याचा शेरा असल्यास असे व्यवहार करू नये अशा सूचना देण्यात आल्याने दस्तनोंदणी बांधली आहे. त्याचा खरेदी-विक्री व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. चार दिवसांपासून कामकाज ठप्पच आहे. काही ठिकाणी चतुः सीमांची कागदपत्रे दिल्यास व्यवहार होईल असे सांगण्यात येते. मात्र एखाद्या गटातील पूर्ण मोजणीची कागदपत्रे नसतील तर व्यवहार होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना आल्यानंतर कामकाज सुरळीत होईल असे कार्यालयाकडून सांगण्यात येत आहेत. कारणे काय? १) जमीन खरेदी विक्री संबंधीच्या १९०८ च्या कायद्यात बदल करण्यात आले आहेत. २) ज्या क्षेत्रातील जमिनीचा व्यवहार आहे त्या क्षेत्रातील गटाची संपूर्ण मोजणीचा नकाशा जोडल्याशिवाय नव्या कायद्याने जमीन व्यवहार करता येणार नाही. ३) मोजणीची कागदपत्रे असल्याने व्यवहार होत नसल्याने मुद्रांक दस्त नोंदणीचे कामकाज ठप्प झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 13/May/2025