SSC Result 2025 : 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, सर्वाधिक विद्यार्थी कोणत्या जिल्ह्यात? पाहा संपूर्ण यादी

मुंबई : SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के इतका लागला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. तसेच यंदा कोकण विभागाचा निकाल लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली. यावेळी शरद गोसावी यांनी किती विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण पडले याबद्दलची माहिती दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा दहावीसाठी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी पास झाले. यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.१० टक्के इतकी आहे. राज्यात २३ हजार ४८९ माध्यमिक शाळातून १५ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ७ हजार ९२४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला.

यावर्षीच्या निकालात सर्वाधिक 100 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी लातूर जिल्ह्यातील आहेत. लातूर विभागात एकूण 113 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण प्राप्त केले आहेत, ज्यामुळे हा जिल्हा अव्वल ठरला आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये 32 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.

100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या

पुणे: 10
नागपूर: 1
छत्रपती संभाजीनगर: 32
मुंबई: 8
कोल्हापूर: 3
अमरावती: 7
नाशिक: 0
लातूर: 113
कोकण: 3

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:47 13-05-2025