गुहागर : बीएलओच्या कामातून प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे तहसीलदार परीक्षित पाटील यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर विधानसभा मतदारसंघांतर्गत बीएलओ म्हणून मतदार यादीच्या कामासाठी जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकांना नियुक्त केले आहे. परंतु, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमनुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामासाठी नेमणूक देण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासावर परिणाम होत आहे.
अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नयेत या शिक्षकांच्या मागणीच्या अनुषंगाने शासनाकडून एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीने सखोल अभ्यास करून शासनास अहवाल दिला आहे. या समितीने शैक्षणिक व अशैक्षणिक कामाचे तीन भागांत वर्गीकरण दिले आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक असणाऱ्या कामाव्यतिरिक्त निवडणूकविषयक नियमित चालणारी कामे हे अशैक्षणिक काम आहे, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे बीएलओचे काम अशैक्षणिक काम असल्यामुळे विद्यार्थी हिताचा विचार करून या कामातून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
हे निवेदन देताना गुहागर तालुका प्राथमिक शिक्षण संघटना समन्वय समितीचे निमंत्रक अरविंद पालकर, कैलास शार्दुल, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष रवींद्र कुळये, सचिव सतीश मुणगेकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अध्यक्ष चंद्रकांत बेलेकर, सचिव समीर पावसकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 11/Oct/2024