एम.पी.एल. मुळे राज्यातील खेळाडूंना संधी मिळेल : आमदार रोहित पवार

दापोली : महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळणार आहे. या स्पर्धेमुळे भविष्यात देशाला गुणवंत खेळाडू मिळतील असे रोहित पवार यांनी बोलताना सांगितले. दापोली येथील रॉयल गोल्ड फील्ड संकुलात पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग एम.पी.एल. व विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग डब्लू.एम.पी.एल. २०२५ या स्पर्धेच्या आयोजनानिमित्त ते बोलत होते. या प्रसंगी मानद सचिव अॅड. कमलेश पिसाळ, रॉयल गोल्ड फील्डचे अनिल छाजेड, एमपीएलचे चेअरमन सचिन मुळे, तसेच अपेक्स कौन्सिल सदस्य शुभेंद्र भांडारकर, राजू काणे, सुनील मुथा, विनायक द्रविड, सुशील शेवाळे, रणजित खिरीड, सीईओ अजिक्य जोशी, तसेच सर्व संघमालक, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र क्रिकेट संघटना आगामी हंगामात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर स्वतःची अकादमी सुरु करणार असून, मुख्य अकादमी अजय शिर्के यांच्या नावाने पुण्यातच सुरु करण्यात येईल. त्यानंतर जिल्ह्यात चार विभागीय अकादमी सुरु करण्यात येणार असून, यातील एक रत्नागिरीत दापोली येथील रॉयल गोल्डफिल्ड क्लब रिसॉर्ट येथे सुरु करण्यात येईल, अशी माहिती देखील रोहित पवार यांनी दिली.

जिल्हा खेळाडूंसाठी उच्च दर्जाच्या क्रिकेट सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आणि महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील मैदानांचा विकास करण्याचा देखिल आमचा मानस असून, यासाठी कोल्हापूर, जालना, परभणी, पुणे, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर अशा सहा जिल्ह्यांना विकासासाठी ७५ लाख रुपयाचे अनुदान देण्यात आले आहे. या जिल्ह्यातील विकास कामांच्या अहवालांचा आढावा घेतल्यानंतर अन्य सर्व जिल्ह्यांनाही समान अनुदान देण्यात येईल, अशी माहितीही रोहित पवार यांनी दिली.

अनेक नवोदित खेळाडू या माध्यमातून राज्य आणि देशाचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास मानद सचिव अॅड. कमलेश पिसाळ यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 13/May/2025