वंदे भारत एक्स्प्रेस गाडी आठवडाभर चालवण्याची मागणी

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर धावणारी मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस मान्सून वेळापत्रकानुसार आठवड्यातील सहा दिवसांऐवजी तीनच दिवस चालवली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी गाडला अतिरिक्त डबे जोडून ही प्रीमियम गाडी दररोज चालवावी, अशी मागणी कोकण विकास समितीने रेल्वेकडे केली आहे.

कोकण रेल्वेकडून राबविण्यात येणाऱ्या मान्सून वेळापत्रकात (15 जून ते 20 ऑक्टोबर) मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस (22229/22230) या लोकप्रिय जलदगती रेल्वेची सेवा आठवड्यातून सहाऐवजी केवळ तीन दिवस होणार आहे. या निर्णयामुळे कोकण रेल्वेमार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणारी वंदे भारत एक्स्प्रेस 95 टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी क्षमतेने नियमितपणे धावणारी सेवा असून, मुंबई-गोवा मार्गावरील प्रवाशांची पहिली पसंती ठरली आहे. मात्र, कोकण रेल्वेमार्गावरील पावसाळी अडचणी लक्षात घेता, या गाडीच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात येते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते.

याच गाडीबरोबर 11099/11100 लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेसची फेरीदेखील पावसाळ्यात चार दिवसांवरून दोन दिवसांवर येणार आहे. त्यामुळे खेड, कणकवली, थिवीसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवरील प्रवाशांसाठी पर्यायी गाड्यांची कमतरता भासू शकते.

या पार्श्वभूमीवर कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर आणि अक्षय महापदी यांनी मध्य रेल्वेकडे वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा मान्सून कालावधीत दररोज सुरू ठेवावी. त्यासाठी एक अतिरिक्त रेक (रोलिंग स्टॉक) तैनात करून दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेससारखी विशेष मान्सून योजना राबवावी, अशी मागणी केली आहे.

या मागणीचा पाठपुरावा करताना त्यांनी रेल्वे मंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींचेही याकडे लक्ष वेधून घेतले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 AM 14/May/2025