सर्वंकष विद्यामंदिर, रत्नागिरीचा CBSE दहावी निकाल 100%; पल पाथरे अव्वल

रत्नागिरी : सर्वंकष विद्यामंदिर, रत्नागिरी येथील इयत्ता दहावीच्या CBSE बोर्ड परीक्षेत यंदा तिसऱ्या बॅचने 100% निकालाची परंपरा कायम ठेवत उल्लेखनीय यश मिळवले आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेची पुष्टी केली. या बॅचमधील पल पाथरे याने 97% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला, तर विघ्नेश वाडेकर याने 95.20% गुणांसह द्वितीय आणि त्वीषा शिंदे हिने 94.60% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.

विषयानुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही विशेष कौतुकास पात्र ठरले आहेत. इंग्रजी आणि विज्ञान विषयात पल पाथरे याने प्रत्येकी 97 गुण मिळवले, तर सामाजिक शास्त्रातही त्याने 97 गुणांसह अव्वल स्थान मिळवले. मराठी विषयात त्वीषा शिंदे, रिया गोरे आणि विघ्नेश वाडेकर यांनी प्रत्येकी 100 गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले. गणित (स्टँडर्ड) मध्ये देवांश देवळेकर आणि पल पाथरे यांनी प्रत्येकी 92 गुण, तर गणित (बेसिक) मध्ये कीर्ती सामंत हिने 83 गुण मिळवले. कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन विषयात कीर्ती सामंत आणि चिन्मयी मयेकर यांनी प्रत्येकी 100 गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली.

या यशस्वी निकालाबद्दल संस्थाचालक गद्रे कुटुंबीय, प्राचार्या मोनिका जैस्वाल, शिक्षकवृंद आणि पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. प्राचार्या मोनिका जैस्वाल म्हणाल्या, “विद्यार्थ्यांचे हे यश त्यांच्या मेहनतीचे आणि शिक्षकांच्या समर्पित मार्गदर्शनाचे फळ आहे. शाळेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा अखंडित ठेवल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे.” पल पाथरे याने आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या शिक्षणपद्धती आणि पालकांच्या पाठिंब्याला दिले. “शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नियमित अभ्यास यामुळे हे यश शक्य झाले,” असे तो म्हणाला.

संस्थाचालक गद्रे कुटुंबीयांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या निकालाने सर्वंकष विद्यामंदिरच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाची प्रचिती आली आहे. शाळेच्या शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 14-05-2025