रत्नागिरी : जिल्ह्यातील १ लाख ७९ हजार शेतकऱ्यांनी काढले फार्मर आयडी

रत्नागिरी : जिल्ह्यातील कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) काढण्यास शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एकूण ४ लाख ८७ हजार ९३६ शेतकऱ्यांपैकी केवळ १ लाख ७९ हजार ५८१ (३६ टक्के) शेतकऱ्यांनीच आपले ओळखपत्र तयार केले आहे.

तालुकानिहाय आकडेवारी पाहिली असता, खेड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ६० टक्के शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढले आहे. तर, रत्नागिरी तालुक्यात सर्वात कमी, केवळ २० टक्के शेतकऱ्यांनीच हे ओळखपत्र घेतले आहे. इतर तालुक्यांमध्ये लांजा (५३%), संगमेश्वर (४२%), गुहागर (४९%), चिपळूण (३६%), मंडणगड (४३%) आणि दापोली (३१%) इतके प्रमाण आहे.

कृषी विभागाच्या प्रधानमंत्री कृषी योजना, एकात्मिक फलोत्पादन, फळबाग लागवड योजना, खरीप व फळपिक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाई यांसारख्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना आपले ओळखपत्र तयार करण्याचे आवाहन केले आहे.

हे ओळखपत्र जवळच्या आधार सेवा केंद्रात उपलब्ध आहे. तसेच, २४ एप्रिलपासून शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलवरूनही ते तयार करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये महसूल विभागाने केलेल्या शेतकरी गणनेनुसार ४ लाख ८७ हजार ९३६ शेतकऱ्यांची नोंद आहे. मात्र, त्यापैकी केवळ ३६ टक्के शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढल्याने, अधिकाधिक शेतकऱ्यांनी हे ओळखपत्र प्राप्त करावे यासाठी कृषी विभाग आता प्रयत्नशील आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:03 PM 14/May/2025