चिपळूण : कोकणात प्रथमच रुग्णाला पूर्णतः भूल न देता शुद्धीत ठेवून मेंदूतील कॅन्सरची गाठ काढण्याच्या जटिल शस्त्रक्रिया भ. क. ल. वालावलकर रुग्णालयात नुकत्याच यशस्वीरित्या पार पडल्या. मेंदूतील कॅन्सरची गाठ ही जर बोलण्याची किंवा हाता-पायांची शक्ती नियंत्रित करणाऱ्या केंद्रांमध्ये पसरलेली असेल तर अशापद्धतीची शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया अतिशय जटिल असून यामध्ये निष्णात न्यूरोसर्जन, भूलतज्ञ आणि रुग्णाचे सहकार्य यांचे योगदान महत्वाचे असते. या दोनही शस्त्रक्रिया १५ दिवसांच्या कालावधीत करण्यात आल्या आहेत.
दोनही रुग्णांच्या मेंदूतील कॅन्सरची गाठ ही मेंदूच्या डाव्या बाजूला असलेल्या; बोलण्याची शक्ती नियंत्रित करणाऱ्या केंद्रामध्ये (Broca’s area) आहे असे निदान करून डॉ. मृदुल भटजीवाले यांनी रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. या दोनही शस्त्रक्रिया रुग्णांना सतत बोलते ठेवून पार पाडण्यात आल्या आहेत. “मेंदूतील” कॅन्सरची गाठ ही महत्वाच्या केंद्रांमध्ये वाढून त्याभोवतीच्या भागात पसरलेली असू शकते. रुग्णाला सतत बोलते ठेवल्याने शस्त्रक्रियेदरम्यानचे संभाव्य धोके टाळता येतात.” असे डॉ. मृदुल भटजीवाले म्हणाले. या शस्त्रक्रिया भ. क. ल. वालावलकर रुग्णालयाचे प्रमुख न्यूरोसर्जन डॉ. मृदुल भटजीवाले आणि सहकारी तसेच भूलतज्ञ डॉ. लीना ठाकूर आणि सहकारी यांच्या प्रयत्नांतून यशस्वीरित्या पार पडल्या.
सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर आणि निष्णात डॉक्टर्स यांच्यामुळे अशाप्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया वालावलकर रुग्णालयात सहजरित्या होत आहेत. दोन्ही रुग्ण शस्त्रक्रियेनंतर व्यवस्थित बोलू शकतात आणि समाधानी आहेत. रुग्णांना त्यांचे आयुष्य परत मिळाल्याचा आनंद डॉ. भटजीवाले यांनी व्यक्त केला. या दोन्ही शस्त्रक्रियांचा संपूर्ण खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजना आणि वालावलकर आरोग्य योजना यांच्याअंतर्गत करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 14/May/2025













