चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे येथील सीएनजी पेट्रोल पंपात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. सीएनजीअभावी अनेक गाड्या या ठिकाणी तासन्तास सीएनजी भरण्याची प्रतीक्षा करीत होत्या. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. यामुळे संतापलेल्या काही प्रवाशांनी सीएनजी पंप ऑपरेटर्सना धारेवर धरून वीजपुरवठा नसल्यावर जनरेटरची सुविधा का नाही, असा सवाल करीत वाद घातला.
कोकणात सीएनजीची टंचाई जाणवत आहे. जिल्हाभरात १४ पंप असतानादेखील मुंबई, पुणे व अन्य ठिकाणांहून येणाऱ्या पर्यटकांमुळे सीएनजीचा पुरवठा कमी पडत आहे. या शिवाय चाकरमानी मोठ्या प्रमाणात गावाला दाखल झाले आहेत. त्यामुळे सीएनजी पंपामध्ये दिवस व रात्री वाहनांच्या रांगा लागत आहेत.
काल दुपारी वालोपे येथील सीएनजी पंपामध्ये गॅस भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक तास उलटले तरी सीएनजी पंप सुरू झाला नाही. अखेर वैतागलेल्या काही महिला व लोकांनी येथील पंप ऑपरेटर्सना धारेवर धरले. पंप चालविता तर मग जनरेटर का ठेवत नाही? ही पंप मालकांची जबाबदारी आहे, अशा शब्दांत सुनावले.
सीएनजी भरण्यासाठी काही तास रांगेत राहावे लागल्याने भर उन्हातून अनेकांची गैरसोय झाली. चहा-पाणी, नाश्त्याची देखील गैरसोय झाल्याने लोकांचा संताप अनावर झाला. त्यांनी हा राग पंप ऑपरेटर्सवर काढला.
विजेअभावी पंप बंद
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, वीजपुरवठा खंडित झाल्याने हा पंप बंद होता, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या सीएनजी पंपात वीज खंडीत असताना पर्यायी जनरेटरची व्यवस्था का नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 15/May/2025













