कोकणात वरकस जमिनीवरील शेतीसाठी संशोधन आवश्यक : डॉ. माणिकराव कोकाटे

रत्नागिरी : कोकणामध्ये भातशेतीला पर्याय नाही, हे खरे असले तरी वरकस जमिनीमध्ये पेरभात पद्धतीचा वापर करून भातशेतीचे कार्बन उत्सर्जन कमी करता येईल का, यावर संशोधन होणे आवश्यक आहे, असे मत कृषी मंत्री डॉ. माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले.

दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४३ वा पदवीदान समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, विद्यापीठाची उज्ज्वल परंपरा आहे. या विद्यापीठाने अनेक राजकीय नेते, अनेक अधिकारी आणि उद्योजक घडविले आहेत. क्लायमेट स्मार्ट शेतीसाठी युद्धपातळीवर संशोधन आराखडा तयार करावा. त्याचप्रमाणे बदलत्या वातावरणात तग धरून राहणारे अधिक उत्पादनक्षम वाण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोकणातील जैवविविधता लक्षात घेऊन ऊर्जा, शेती तसेच पशुधन शेती पद्धतीतील संधींचा शोध घेणे या गोष्टीसुद्धा आवश्यक आहेत. . कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पीक आरोग्याचे विश्लेषण, मातीतील कार्बनचे प्रमाण शोधणे, मातीच्या आरोग्याची सविस्तर माहिती मिळविणे, तणाचा प्रकार ओळखणे, पूर्वीच्या उत्पन्नाची तुलना, मातीचे तापमान, वातावरणातील आर्द्रता, पिकावरील रोग व किडींचा प्रादुर्भाव ओळखणे, पिकावरील जैविक, अजैविक ताण ओळखणे या सर्व गोष्टी शेतकऱ्यांच्या हातात येणार आहेत. कोकणातील जवळजवळ ३.५ लाख हेक्टर क्षेत्र हे आंबा, काजू आणि इतर फळपिकांखाली आहे. काजू या पिकांमध्ये सखोल संशोधन केलेले आहे. ड्रोन प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे. त्याचे सविस्तर प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षित तरुण-तरुणी आले तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईलच त्याचबरोबर तुम्हा तरुणांना व्यवसायाची संधी प्राप्त होईल.

डॉ. कोकाटे म्हणाले, हापूस आंबा तर कोकणाची शान आहे. मात्र मागील वर्षी थ्रिप्समुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. निसर्गात हे सगळे अचानक घडत असते. मात्र विद्यापीठांनी अगोदरच या गोष्टींचा विचार करून शिक्षण, संशोधन आणि शेतकऱ्यांना विस्तार कार्यामार्फत प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. विद्यापीठाने भाताच्या ३५ जाती विकसित केलेल्या आहेत आणि ३.५ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. यातील रत्नागिरी ८ या जातीची देशामध्ये खूप मागणी आहे. तरुण वर्गाला जर शेतीकडे वळवायचे असेल तर यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही, हे शास्त्रज्ञांनी ध्यानात घेतले पाहिजे. शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचे संशोधन पाहिजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

केवळ नोकरीच्या मागे धावू नका. शेतीत उतरा, शेतीपूरक व्यवसाय करा. शेतमालाच्या प्रक्रिया उद्योगाला खूप संधी आहे. आपल्या या शिक्षणाचा फायदा सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी तुम्हा तरुण-तरुणींवर अवलंबून आहे. आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून आणि प्रगत शेती तंत्राज्ञानाचा अवलंब करून भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी आपण नक्कीच

योगदान कराल, याची मला खात्री वाटते, असेही ते म्हणाले.

यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, पालकमंत्री उदय सामंत, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, कुलगुरू डॉ. संजय भावे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 15-05-2025