दिशाहीन आयुष्यात अध्यात्म दिशादर्शकाचे काम करते : मंत्री योगेश कदम

खेड : आजच्या संघर्षमय जीवनात मनशांती मिळवणे अत्यावश्यक बनले आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या स्पर्धेवर मात करण्यासाठी आध्यात्मिक दृष्टीकोनाचा खूपच फायदा होतो. याचमुळे दिशाहीन आयुष्यात अध्यात्म निश्चितपणे दिशादर्शक ठरत असल्याने सुंदर आयुष्य जगण्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.

तालुक्यातील तिसंगी येथील श्री केदार काळकाई देवीच्या जत्रोत्सवास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सदिच्छा भेट दिली असता, तिसंगी ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, आध्यात्मिक मार्गावर मार्गक्रमण करणाऱ्यांसाठी भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ हे सर्व काळ सारखेच असतात. तरी जोपर्यंत आपण स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत दुसऱ्याला समजून घेण्यात अडचणी येतात.

यासाठी आधी स्वतःला ओळखणे आवश्यक आहे. असे त्यांनी सांगितले. तिसंगीच्या केदार काळकाई जत्रोत्सवातील मंगलमय वातावरणाने मन प्रसन्न झाल्याचे स्पष्ट करत गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. माझ्या पाठीशी सदैव उभे राहणाऱ्यांना तिसंगीच्या विकासासाठी निधीची अजिबात कमतरता भासू देणार नाही, असे अभिवचनही त्यांनी दिले.

श्री केदार काळकाई जत्रोत्सवातील विविधांगी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांत स्थानिकांसह मुंबई, पुणेस्थित ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला, जत्रेचा मानबिंदू असलेल्या लाट फिरवण्याच्या कार्यक्रमात भाविकांच्या उत्साहाला उधाणच आले होते. रविवारी विविध गावातील पालख्यांना निरोप देण्यात आला. लाट उतरवल्यानंतर जत्रोत्सवाची सांगता झाली. रात्री १० वाजता तरुण सावण्यवतींचा लावण्या चंद्रा’ हा कार्यक्रम पाहण्यासाठी रसिकांची एकच गर्दी उसळली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 PM 15/May/2025