रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील सोनवी पूल परिसरात चौपदरीकरणाच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना वारंवार करावा लागत आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळी ही स्थिती अधिकतर निर्माण होत असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी आहे.
चारचाकी वाहनांबरोबच अवजड वाहनेही ये-जा करत असल्याने कोंडीतून सुटका होण्यासाठी अर्घा ते सव्वातास अर्धा ते एक किलोमीटरच्या मार्गावर करावा लागत आहे. त्यामुळे पर्यटकांसह नागरिकांना ठरलेल्या वेळेत नियोजित ठिकाणी पोचणे अवघड होत आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे चाकरमान्यांसह पर्यटकांची पावले पर्यटनस्थळांकडे वळल्याने वाहतुकीत भर पडली आहे. वाहतूक
पोलिसांसह ठेकेदाराकडून योग्य नियोजन होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण होत आहे.
मुंबईच्या दिशेने जाताना संगमेश्वर येथील विश्रामगृहाच्या वळणापासून वाहनांच्या रांगा लागण्यास सुरूवात होते ती अगदी पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर सुरू असलेल्या एका पुलापर्यंत सुरू राहते. कासवगतीने वाहन चालवण्याचा अनुभव या परिसरात चालकांना येत आहे. मागील काही दिवस ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत तर वाहनांची प्रचंड गर्दी असते. या कालावधीत या परिसरातून प्रवास करणे म्हणजे सत्वपरीक्षेसारखेच आहे.
लोखंडी किंवा अवजड वस्तू वाहून नेणारे ट्रेलर, ट्रक हे या रांगांमध्ये असतील तर इंचइंच पुढे सरकण्यासाठी पाच ते दहा मिनिटे एकाच ठिकाणी उभे राहण्याशिवाय पर्याय उरत नाही. ही परिस्थिती अनेक प्रवाशांनी मांडली आहे. याचवेळी एखादी रुग्णवाहिका आली तर मोठीच पंचाईत होते. त्या रुग्णवाहिकेला जागा मोकळी करून देण्यासाठी वाहन चालकांचीच धडपड सुरू असते. संगमेश्वर एसटी बसस्थानकासमोर वाहतूक पोलिस उभे राहून पुलावरून वाहने सुरूळीत आहेत किंवा नाहीत ते पाहत असतात. मात्र पोलिस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अरुंद भागाच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या परिसरात वाहतूक पोलिस दिसत नाहीत. त्यामुळे अनेक बेशिस्त चालक रिकामी जागा मिळाली की तिथे गाड्या नेऊन उभ्या करतात. या गोंधळात कोंडी अधिक वाढत जाते.
अशा वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शास्त्री पुलाजवळ पोलिसांची यंत्रणाच नव्हे तर ठेकेदाराकडूनही तजवीज करणे आवश्यक आहे. अन्यथा रोजच वाहतूक कोंडीचे हे रडगाणे सांगत प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे. याकडे पोलिस यंत्रणेकडूनही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
चिपळूणहून रत्नागिरीकडे येताना किंवा रत्नागिरीतून चिपळूणकडे जाण्यासाठी संगमेश्वर शास्त्री पुलावरील मार्ग टाळावयाचा असेल तर डिंगणी मार्गे वाहने नेणे वेळेच्यादृष्टीने योग्य ठरत आहे. हा रस्ता थोडा अरूंद असला तरीही वाहतूक कोंडीतून सुटका देणारा आहे. रत्नागिरीतून जाकादेवी येथून डिंगणीमार्गे संगमेश्वर धामणी येथे महामार्गावर जाता येते.
संगमेश्वर बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी झाल्यामुळे नियोजित ठिकाणी वेळेत पोहोचता आले नाही. सुमारे पाऊण तासाहून अधिककाळ या परिसरातच गाडी थांबवून ठेवावी लागली होती- प्रशांत फुटक, रत्नागिरी
मंत्र्यांनाही बसला वाहतुकीचा फटका
राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले हे रविवारी एसटी बसस्थानकाच्या उद्घाटनाला आले होते. त्यांनाही संगमेश्वरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. काही वेळाने पोलिसांनीच बाजू काढून दिल्यामुळे मार्ग मिळाला; मात्र इतर प्रवाशांचे हाल झाल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 PM 15/May/2025













