रत्नागिरी : जिल्ह्यातील १,५३४ गावांमध्ये होणार पाणी गुणवत्ता तपासणी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फिल्ड टेस्टींग किटद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती अभियानाचा शुभारंभ झाला आहे. ही मोहीम ७ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व १५३४ गावामध्ये ही अभियान राबवून नागरिकांना स्वच्छ, शुध्द गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलबध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांनी दिली.

पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती अभियाना अंतर्गत रासायनिक व जैविक फिल्ड टेस्टींग किट संचाद्वारे गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्याबाबत केंद्र शासनाने सुचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने दि. १९ ते २३ मे २०२५ या कालावधीत जनजागृती अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभगट विकास अधिकारी यांचे हस्ते करण्यात येणार आहे तर दि. २ जून ते ७ जून २०२५ कालावधीत अभियानाची ग्रामपंचायत स्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल. जिल्ह्यातील १५३४ गावामध्ये या अभियानदरम्यान फिल्ड टेस्टींग किटद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी करावयाची आहे.

या अभियान अंतर्गत गावात पाणी तपासणी करण्यासाठी निवड केलेल्या व संकेतस्थळावर नोंदविलेल्या पाच महिलांची पडताळणी करणे, महिलांच्या पाणी गुणवता विषयक फिल्ड टेस्टींग किट प्रशिक्षणाच्या नोंदी घेणे, गावात आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांनाफिल्ड टेस्टींग किटद्वारे पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक देणे, ८ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांमार्फत शाळा, अंगणवाड्या, घरगुती नळ जोडण्यामधील पाणी नमुने तपासणी करणे, डब्यू.क्यू.एम.आय.एस. पोर्टलवर नोंदी घेणे, नळ पाणी पुरवठा योजना स्त्रोत, घरगुती नळ जोडण्या, शाळा, अंगणवाड्यांची पाणी गुणवता तपासणी करण्यासाठी रासायनिक व जैविक फिल्ड टेस्टींग किट चे वाटप करणे, स्थानिकांना पाणी गुणवत्ता तपासणी व त्यापासून होणारे फायदे सांगितले जाणार आहे.

या अभियानामध्ये सर्व शासकिय यंत्रणांनी सहभाग घेऊन पाणी गुणवत्ता तपासणी आणि व्यापक जनजागृती करावी असे अवाहन प्रकल्प संचालक राहुल देसाई यांनी केले.

काय आहे क्षेत्रीय तपासणी (एफटीके) संच
फिल्ड टेस्टींग किट म्हणजे क्षेत्रीय तपासणी संच हे एक पोर्टेबल उपकरण आहे. जे प्राथमिक स्वरूपात पिण्याच्या पाण्यातील रासायनिक आणि जैविक घटकांची तपासणी करण्यासाठी वापरले जाते. यामुळे पाण्याची गुणवत्ता त्वरित ठरवणे, गावपातळीवर नागरिकांना पाण्यातील अशुद्धता ओळखण्यास मदत करणे हा या संचाचा उद्देश आहे. यामध्ये पी.एच., क्लोरिन, नायट्रेट्स, फ्लोराइड, क्लोराईड, लोह, अल्कलिनिटी, गढूळपणा, हार्डनस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम या रासायनिक तसेच जैविक घटकांची तपासणी केली जाते. याचा लगेच निकाल (प्राथमिक स्तरावर) मिळतो.

अभियानामध्ये या विभागांचा राहील सहभाग
फिल्ड टेस्टींग किटद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती अभियानामध्ये ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पाणीपुरवठा विभागाचा सहभाग राहील. सर्वांच्या मदतीने व्यापक जनजागृती मोहीम यशस्वी केली जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:46 PM 17/May/2025