रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत बदल्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बदली पोर्टलवर भरलेली माहिती दुरूस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अवघड क्षेत्रातून बाहेर पडण्यास इच्छुक असलेल्या शिक्षकांना या निमित्ताने संधी मिळाली आहे; परंतु ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान दीड महिन्याचा कालावधी लागणार असल्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतरच
बदल्यांच्या ठिकाणी शिक्षकांना रुजू व्हावे लागणार आहे. ऐन पावसाळ्यात शिक्षकांचा गोंधळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू झाली आहे. यंदा मे महिन्याच्या ऐन सुटीत प्रक्रिया सुरू झाल्यामुळे शिक्षकांचा गोंधळ उडाला आहे. याबाबत शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन संचमान्यतेला न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्याने बदल्यांसाठी जुन्या संचमान्यतेनुसार रिक्त पदांची संख्या ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या एक हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्याप्रमाण प्रत्येक तालुक्यात बदल्यांसाठी समानीकरणांतर्गत १४ टक्के जागा रिक्त ठेवल्या जाणार आहेत.
त्यानुसार बदलीपात्र शाळांची आणि शिक्षकांची यादी तयार केली जाणार आहे. संवर्ग १, २, ३, ४ आणि नुसार बदली प्रक्रिया होणार आहे. पहिल्या टप्प्यात शिक्षकांनी भरलेली माहिती दुरुस्तीसाठी बदली पोर्टल खुले करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात इच्छुक शाळांची नावे भरून घेतली जातील. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. यासाठी किमान दीड महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, उन्हाळी सुट्यांचा कालावधी १६ जूनला संपत आहे. तोपर्यंत बदली प्रक्रिया सुरू होणे अशक्य आहे. त्यामुळे जून महिन्यात मुसळधार पावसात शिक्षकांना नवीन शाळेत पाऊल ठेवावे लागणार आहे. बदलीमध्ये अवघड क्षेत्रातील शाळांसाठी २०२२ला तयार केलेली यादी घेण्यात आली आहे. त्यामध्ये ६५० शाळा आहेत. मागील बदलीवेळी एक हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. यंदाही तेवढ्याच बदल्या होतील, असा अंदाज आहे.
३० शाळांची नावे भरावी लागणार
बदल्यांसाठी प्रत्येक शिक्षकाला ३० शाळांची नावे भरावी लागणार आहेत. सद्यःस्थितीत मंडणगड, राजापूर, दापोली या तीन तालुक्यांत रिक्त पदांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांना त्या शाळांची निवड करावी लागणार आहे.
प्रशासनाने शिक्षक बदल्यांची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली पाहिजे. जून महिन्यात प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने ऐन पावसात शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागेल. त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे- – संतोष रावणंग, सचिव, प्राथमिक शिक्षक संघ
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 PM 15/May/2025














