चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपूलखालून प्रांत कार्यालयासमोर भुयारी मार्गाचे काम सुरू आहे; परंतु या मार्गासाठी मोठ्या प्रमाणात भराव केला जात आहे. त्याचा अडथळा तयार होऊन येथील प्रांत कार्यालय परिसरातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे भुयार मार्गाचे काम रद्द करावे, अशी मागणी माजी नगरसेवक संजय तांबडे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली आहे.
चिपळूण शहर व परिसरात २०२१च्या पुरात मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी होऊन जनजीवन उद्ध्वस्त झाले होते, त्यामुळे येथे होणारे मानवनिर्मित अंडरपास शहरात पुराचे महासंकट उभे करतील म्हणून ते सर्वाच्या सहकार्याने रद्द केलेले आहेत; परंतु सध्या प्रांत कार्यालय ते पंचायत समितीदरम्यान अंडरपासचे काम सुरु झाले आहे. या मार्गामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात साधारणतः २० फूट उंच, ६० फूट रुंद आणि अंदाजे अर्धा किलोमीटर लांब असरा मातीच्या भरावाची भिंत तयार होत आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर डोंगर उतारावरून येणारे पाणी तसेच पुराचे पाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुडुंब भरणार आहे. दोन्ही बाजूचे रस्ते आणि अंडरपासदेखील पाण्याखाली जाणार आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या घरातदेखील पाणी जाण्याची शक्यता आहे. शहरात पुराचे पाणी भरू नये यासाठी गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याला देखील खीळ बसणार आहे. लाल व निळी पूररेषा देखील धोक्यात येऊ शकते.
उड्डाणपुलाचा प्रस्ताव
ऐन पावसाच्या तोंडावर महाकाय मातीच्या भरावाचे भुयारी मार्गाचे काम थांबवावे बहादूरशेख नाका ते पाग रेस्टहाऊसपर्यंतचा संपूर्ण उड्डाणपुलाचा पाठवलेल्या प्रस्तावाचा शासनस्तरावर त्याचा विचार चालू आहे. त्याचा पाठपुरावा करावा, अशी मागणी तांबडे यांनी केली आहे.
अंडरपासमुळे शहराचे विद्रुपीकरण होणार आहे. संपूर्ण उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्यासाठी अजून कित्येक वर्षे जाणार आहेत. त्यामुळे या अंडरपासचे मध्येच काम पूर्ण करून कोणता हेतू शासन साध्य करणार आहे? हे कळत नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 15/May/2025













