मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीची शेवटची कॅबिनेट बैठक गुरुवारी मंत्रालयात घेण्यात आली. मात्र या बैठकीतून उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्यांच्याकडे अर्थ खात्याचाही कारभार आहे ते १० मिनिटांतच निघून गेल्याची माहिती समोर आली आहे.
उद्योगरत्न रतन टाटा यांना श्रद्धाजली वाहिल्यानंतर अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर या बैठकीत ३८ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले जे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भर टाकणारे आहेत.
अजित पवार निघून गेल्यानंतर अडीच तास सुरू असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेवटपर्यंत उपस्थित होते. सूत्रांनुसार, अजित पवार प्रचंड नाराज असल्याचं बोललं जातं, शेवटच्या क्षणी मंत्रिमंडळासमोर राज्यातील कारभार आणि महत्त्वाचे आर्थिक निर्णयांचे प्रस्ताव आणले गेले. त्यासाठी योग्य प्रक्रियेचे पालन होत नाही. बैठकीला काही वेळ उरला असताना आपल्यासमोर प्रस्ताव ठेवले जातात यावरून ते नाराज असण्याची शक्यता आहे. मात्र गुरुवारी मंत्रिमंडळातून अजित पवार निघून गेल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. एका इंग्रजी दैनिकाने हे वृत्त दिले आहे.
सुनील तटकरे काय म्हणाले?
अजित पवार बैठकीतून निघून गेले त्यामुळे ते नाराज आहेत का अशी चर्चा सुरू झाली. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, मी रायगडला होतो, कॅबिनेटमध्ये काय झाले याची कल्पना नाही. परंतु महायुतीत कुठलाही वाद नाही. जर कॅबिनेटमधून कुणी लवकर निघून गेले असेल तर त्याचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अनेक योजनांवरील ९६ हजार कोटींच्या निधीवरून राज्य सरकारवर आधीच टीका होत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला ४६ हजार कोटी खर्च होणार आहेत. अर्थ खात्याने याआधीच बजेटमधील आर्थिक तुटीवरून सरकारला सतर्क केले आहे. त्यात अजित पवार पहिल्यांदाच अशाप्रकारे कॅबिनेट बैठक सोडून बाहेर गेले, नेमकं यामागे कारण काय हे माहिती नाही. संपूर्ण बैठकीत त्यांची खुर्ची रिक्त होती असंही एका अधिकाऱ्याने सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 11-10-2024
