रत्नागिरी: शहरातील गजबजलेल्या जयस्तंभ परिसरात सोमवारी (दि. २०) रात्री दोन तरुणांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वादाचे रूपांतर थेट हॉकी स्टिकने केलेल्या मारहाणीत झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. शहरातील जयस्तंभ एसटी स्टॉपजवळ फिर्यादी अभिषेक शशिकांत रहाटे (वय ३४, रा. तेली आळी, रत्नागिरी) हे उभे होते. यावेळी संशयित गणेश दत्ताराम महाडीक (रा. मारुतीमंदिर, रत्नागिरी. मूळ गाव: नरबे, करबुडे) हा आपली मोटार (क्र. एमएच-०२ सीपी २७३६) घेऊन तिथे पोहोचला.
गाडीतून उतरताच गणेश महाडीक याने अभिषेक रहाटे यांना लक्ष्य करत वाद घालण्यास सुरुवात केली. “तू माझ्या बायकोला फिरायला घेऊन जातोस काय? तू कसे लग्न करतोस ते बघतो,” असे म्हणत त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
हॉकी स्टिकने जीवघेणा हल्ला
वाद विकोपाला गेल्यावर गणेश महाडीक याने आपल्या मोटारीतून हॉकी स्टिक काढली आणि फिर्यादी अभिषेक यांच्यावर हल्ला केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात अभिषेक यांच्या डोक्याला, गालाला आणि ओठाला गंभीर दुखापत झाली, तसेच त्यांच्या दातांनाही इजा पोहोचली. भररस्त्यात घडलेल्या या हाणामारीमुळे तिथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस कारवाई
या प्रकारानंतर जखमी अभिषेक रहाटे यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संशयित गणेश दत्ताराम महाडीक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुख्य कारण पती-पत्नी यांच्यात सुरू असलेला घटस्फोटाचा (Divorce) दावा आणि त्यातून निर्माण झालेला वाद असल्याचे समोर येत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:20 23-04-2026














