चिपळूण येथे जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन

चिपळूण : गोवळकोट (ता. चिपळूण) येथे जय हिंद क्रीडा मंडळाच्या वतीने संस्थेच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवार, २३ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा रात्री ९ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण, शिंदेवाडी (गोवळकोट) येथे रंगणार आहे. जिल्ह्यातील विविध नामांकित नृत्यसंघ या स्पर्धेत सहभागी होणार असून, पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात सादर होणारे जोशपूर्ण पालखी नृत्य, आकर्षक वेशभूषा आणि सादरीकरणातील समन्वय प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे.

पालखी नृत्य ही कोकणच्या सांस्कृतिक वारशाची ओळख जपणारी लोककला असून, या स्पर्धेद्वारे या कलेचा व्यापक प्रचार-प्रसार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि युवकांमध्ये पारंपरिक कलेविषयी आवड निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

जय हिंद क्रीडा मंडळ गेली अनेक वर्षे सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असून, या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचा सन्मान करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

या अनोख्या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी, कला रसिकांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. गोवळकोटमध्ये प्रथमच होणारी ही पालखी नृत्य स्पर्धा उत्साह, परंपरा आणि कलात्मकतेचा संगम ठरणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 23-04-2026