रत्नागिरी: आरोग्यविषयक सरकारी योजनांचा लाभ न मिळालेल्या राज्यातील गरजू आणि पात्र रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतानिधी’ संजीवनी ठरत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात ३९० रुग्णांना तब्बल ३ कोटी ७ लाख ६४ हजार रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. या मदतीमुळे गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांना उपचारांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
पारदर्शक आणि वेगवान कार्यपद्धती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने या निधीच्या कार्यपद्धतीत व्यापक सुधारणा करण्यात आल्या आहेत. जिल्हा स्तरावर स्वतंत्र कक्षाची स्थापना, पूर्णपणे ‘पेपरलेस’ अर्ज प्रक्रिया आणि अर्जाचा तातडीने निपटारा यामुळे मदतीचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. याशिवाय, विविध रुग्णालये, संस्था, दाते आणि ‘क्राउड फंडिंग’च्या माध्यमातून मिळत असलेल्या सहकार्यामुळे पारदर्शकता वाढली असून, अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत वेळेत आर्थिक सहाय्य पोहोचत आहे.
कोणत्या २० गंभीर आजारांसाठी मिळते मदत?
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतानिधी अंतर्गत खालील २० गंभीर आजारांच्या उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाते:
- अवयव प्रत्यारोपण: हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हात, गुडघा आणि हिप रिप्लेसमेंट.
- शस्त्रक्रिया: कर्करोग शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, अस्थिबंधन (लिगामेंट) सर्जरी.
- इतर गंभीर उपचार: कोक्लियर इम्प्लांट (२ ते ६ वयोगटातील बालकांसाठी), डायलिसिस, कर्करोग (केमोथेरपी/रेडिएशन), रस्ते अपघात, बर्न (भाजलेले रुग्ण) आणि विद्युत अपघात.
- बालकांचे आरोग्य: नवजात शिशूंचे आजार.
तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकारामुळे ‘बीपीसीएल फाऊंडेशन’ आणि ‘टाटा मेमोरियल सेंटर’ यांच्याशी बालकांच्या कर्करोग उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे, ज्यामुळे सीएसआर निधीतून गरजू बालकांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळणे सोपे झाले आहे.
मोठ्या प्रमाणावर मदत वितरण
राज्यभरात १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत सुमारे ४०,७७६ रुग्णांना ३३३ कोटींहून अधिक रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. यात रत्नागिरी जिल्ह्याचाही मोठा वाटा असून, जिल्ह्यासाठी ही योजना आरोग्यसेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
रुग्णांसाठी आवाहन
रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या अधिकृत सुविधेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी व मदतीसाठी रुग्णांनी टोल-फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:03 23-04-2026














