धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत विलास रहाटे प्रथम

संगमेश्वर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती यावर्षी प्रथमच आगळ्या वेगळ्या उपक्रमांनी साजरी करण्याचे स्मारक समतीने ठरवले आणि जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले. यावर्षी नियोजनासाठी कालावधी कमी पडल्यामुळे या चित्रकला स्पर्धेचे स्वरूप जिल्ह्यापुरते मर्यादित ठेवण्यात आले होते. पुढील वर्षी ही स्पर्धा राज्य स्तरीय स्वरूपाच्या भरवून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत अनेक कलाकृती संग्रहीत कारण्याचा स्मारक समितीचा प्रयत्न असेल, असे प्रतिपादन स्पर्धेचे आयोजक राजेंद्र महाडीक यांनी केले.

छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेस कलाकारांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत अनेक प्रतिभावंत कलाकारांनी भाग घेतला.या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी राजेंद्र महाडिक हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र महाडिक तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशीर्के, कसबा गावच्या सरपंच पूजा लाणे,मुरलीधर बोरसुतकर, परशुराम पवार देवरुख कला महाविद्यालयाचे प्राचार्य रणजीत मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत विलास राहटे यांनी प्रथम क्रमांक पटकावून २५,००० रुपयांचे बक्षीस मिळवले. साई सनगरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावत २०,००० रुपये तर प्रणय फराटे यांना तृतीय क्रमांकासाठी १५,००० रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. याबरोबरच काही कलाकृतींना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन या कलाकारांचा गौरव करण्यात आला. विजेत्या कलाकारांना रोख पारितोषिका बरोबरच, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देखील देण्यात आले.

या स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी प्रियांश मिठागरे, प्रज्वल सनगरे, गुरुदेव बारगोडे, रोहित कोकाटे आणि प्रदीप शिवगण यांची निवड करण्यात आली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.कसबा येथे होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीमध्ये सध्याची चित्रे लावण्यात यावीत असे मत प्रमुख पाहुणे प्रकाश राजेशिर्के यांनी व्यक्त केले. कलाकारांना अशा स्पर्धेतून आपलं कौशल्य दाखविण्याची मोठी संधी असते, परिणामी कलाकारांनी मोठया संख्येने अशा स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन राजेशिर्के यांनी करुन स्पर्धा आयोजकांचे कौतुक करुन त्यांना धन्यवाद दिले.

चित्रकला स्पर्धेच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:50 15-05-2025