रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळात भरकटून मिऱ्या किनाऱ्यावर अडकलेल्या ‘बसरा स्टार’ जहाजाला आता २ जून २०२५ रोजी पाच वर्षे पूर्ण होतील, पण ते अजूनही तिथेच आहे. किनारा सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असलेले हे जहाज हटवण्यात यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही.
सुमारे ३५ कोटी रुपये किंमतीचे हे जहाज आता केवळ २ कोटी रुपयांमध्ये भंगारात काढले जाणार आहे. एम. एम. शिपिंग कार्पोरेशन कंपनी यासंदर्भात कस्टम विभाग आणि मेरिटाईम बोर्डाशी सतत पत्रव्यवहार करत आहे. मात्र, वरिष्ठ स्तरावर अद्याप याला मंजुरी न मिळाल्याने यावर्षीचा पावसाळाही हे जहाज मिऱ्या किनाऱ्यावरच काढणार असल्याचे निश्चित झाले आहे. मेरिटाईम बोर्डाने याला दुजोरा दिला आहे.
या जहाजाला किनाऱ्यावरून हटवण्यासाठी काही हालचाली झाल्या होत्या. जहाजाजवळच्या बंधाऱ्याचे दगड हटवून तो थोडा खाली बसवण्याचे काम पत्तन विभागाने केले होते. त्यामुळे लवकरच मिऱ्या समुद्रकिनारा सुरक्षित होईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, हे कामही आता रखडले आहे.
एम. एम. शिपिंग कार्पोरेशन कंपनीचे आतिफ सोलकर याबाबत पाठपुरावा करत आहेत. परवानगी मिळाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत हे जहाज कापून बाहेर काढले जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, पावसाळा तोंडावर असूनही जहाज भंगारात काढण्याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. याचा परिणाम मिऱ्या बंधाऱ्याच्या दोनशे मीटर लांबीच्या कामावर झाला असून ते रखडले आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरेमंत्री नितेश राणे यांच्या आढावा बैठकीत या कामाला अधिक गती मिळाली होती, मात्र तरीही अपेक्षित कार्यवाही झालेली नाही. दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क साधण्यात आला असून, त्यांना ४० लाख रुपयांची कस्टम ड्युटी भरावी लागणार आहे. त्यानंतरच जहाज भंगारात काढण्याची पुढील प्रक्रिया सुरू होईल. कन्सल्टंट कंपनीने याबाबत पत्रव्यवहार सुरू केला आहे. केंद्र शासनाकडून भंगारात काढण्याची परवानगी मिळाल्यानंतर कस्टम विभाग जहाजाचे मूल्यांकन करेल. सध्या या दिशेने प्रक्रिया सुरू आहे. बंधाऱ्याचे काम सुरू झाले असून, जहाजाजवळील मोठे दगड हटवून तो सपाट केला जात आहे, जेणेकरून जहाज काढणे सोपे जाईल. मात्र, वरिष्ठ पातळीवरील मंजुरीची प्रतीक्षा कायम आहे.
जहाज पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
दरम्यान, मिऱ्या येथे अडकलेले हे ‘बसरा स्टार’ जहाज पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. सोशल मीडियावर या जहाजाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अनेकजण दूरदूरहून ते पाहण्यासाठी येत आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी स्थानिकांनी छोटेखानी उपहारगृहे सुरू केली आहेत, ज्यामुळे स्थानिकांना रोजगारही मिळाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:56 PM 15/May/2025














