वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढणार : प्रकाश आंबेडकर

खेड : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चार महिन्यांच्या आत प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्याच्या राजकारणाला नवसंजीवनी मिळाली. एकीकडे राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला असतानाच, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कोकण दौऱ्यात स्पष्ट भूमिका घेत युती-आघाड्यांतील अस्थिरतेकडे लक्ष वेधले, तसेच वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढणार असल्याचा सूतोवाच त्यांनी केला.

प्रकाश आंबेडकर रविवारी खेड तालुक्यातील मोरवंडे गावात आयोजित विहार उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर आयोजित सभेत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना स्थानिक निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले, राज्यात वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत; मात्र, स्थानिक युती-आघाड्यांचा निर्णय जिल्हास्तरीय नेत्यांनी तेथील परिस्थिती लक्षात घेऊन घ्यावा, असे त्यांनी सांगितले. तसेच संभाव्य युतींबाबत त्यांनी रोखठोक सवाल उपस्थित करत सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. शिवसेना काँग्रेससोबत राहील का? काँग्रेस राष्ट्रवादीसोबत किती काळ टिकेल? भाजप-शिंदे गट युतीचा पाया किती भक्कम आहे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 AM 16/May/2025