रत्नागिरी : जिल्ह्यात ४ महिन्यांत डेंग्यूचे केवळ ४ रुग्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२४ मध्ये डेंग्यूचे २५६ रुग्ण आढळले होते. आरोग्य विभागाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे यावर्षी हे प्रमाण कमी होऊन जानेवारी २०२५ पासून एप्रिल अखेरपर्यंत केवळ ४ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी दिली.

दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. जिल्ह्यात शुक्रवारी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करुन कीटकजन्य रोगनियंत्रण उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्ह्यामध्ये वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याबाबत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून, दूषित एडिस डासाची मादी चावल्याने त्याचा प्रसार होतो. डेंग्यूच्या प्रसाराच्या नियंत्रणासाठी पाण्यातील एडिस डासाची अंडी, अळी, कोष व पूर्ण डास ही वाढ खंडित केली तरच डेंग्यू या आजाराचा प्रसार नियंत्रित करता येईल. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

यामध्ये ग्रामपंचायतींची भूमिका अधिक महत्त्वाची असून, ग्रामपंचायतींनी जनजागृतीच्या छोट्या छोट्या उपक्रमांवर भर द्यावा, अशी सूचना जिल्हा परिषदेकडून तसेच जिल्हा हिवताप विभागाकडून करण्यात आली आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना
परिसर स्वच्छ ठेवून डासोत्पत्तीची स्थाने नष्ट करणे.
कायमस्वरुपी डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे.
पाणी साठवणुकीची भांडी रिकामी करुन घासून पुसून कोरडी करून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे.
गावामध्ये इको फ्रेंडली कार्यक्रमांतर्गत सर्व शौचालयाच्या व्हॅट पाइपला व आऊटलेटला जाळी बसविण्याचा कार्यक्रम घेणे.
परिसरातील प्लास्टिक, टायर्स, भंगार साहित्य अशा निरुपयोगी साहित्यांची विल्हेवाट लावणे.
तुंबलेली गटारे वाहती करणे व डबकी बुजवणे.
सातत्याने जनजागृती करणे.
नियमित पाणी शुद्धीकरणासाठी पाण्यामध्ये योग्य त्या प्रमाणात उत्तम प्रतीच्या टी.सी.एल. पावडरचा वापर करणे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 16/May/2025