शिवेसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपलं पुस्तक ‘नरकातील स्वर्ग’ मध्ये राजकारणातील खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात मोठा दावा केला आहे.
‘गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली’ असं त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटलं आहे, दरम्यान संजय राऊत यांच्या या गौप्यस्फोटानंतर आता भाजप नेत्यांकडून संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना खोचक टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
मी कादंबऱ्या वाचणे कधीचं सोडलेले आहे, कथा, कादंबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही. त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही, त्यांचे सोडून द्या, ते खूप मोठे नेते आहेत का असो खोचक टोला यावेळी फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
दरम्यान लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत? या निवडणुकांबाबत आता सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुका महायुती म्हणून लढवणार का? असा प्रश्न देखील यावेळी देवेंद्र फडणीस यांना विचारण्यात आला, याला देखील फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे, आम्ही महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.
काय आहे संजय राऊत यांचा दावा?
संजय राऊत यांनी आपल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ‘गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली’ असं त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटलं आहे. यातील अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे, यातील अनेक घटना मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत, असंही राऊत यांनी यावेळी म्हटलं.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:34 16-05-2025
